मोठय़ा शहरात प्रेमी युगुलांना ‘जागेची’ अडचण नेहमीच भासत असते. मुंबईत तर स्थिती आणखीनच बिकट आहे. परिणामी चौपाटय़ा, बागा, शीव, माहीम आदी किल्ले अशा सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांच्या ‘रांगोळ्या’ पसरलेल्या दिसतात. पण आता जोडप्यांना एक नवीन ‘ठिकाण’ सापडले आहे. अर्थातच हे ठिकाण आहे, मुंबई-ठाण्यातील अनेक मल्टिप्लेक्स थिएटरमधील खास बनविलेल्या ‘कपल सीट्स’. वातानुकुलीत वातावरण, सहज उपलब्धता आणि तीन तासांचा एकांतवास या ‘प्लस पॉइंट्स’मुळे कपल सीट्स वेगात ‘लव्ह स्पॉट’ म्हणून ‘युगुलप्रिय’ होत आहेत. स्वाभाविकच या कपल्स सीटची मागणी वाढू लागली आहे. पूर्वी जोडपी ‘कॉर्नर सीट’ मागायचे आता कपल्स सीट्सना मागणी आहे.
प्रेमी जोडप्यांना एकांत हवा असतो. कारण बहुतांश प्रकरणांत मामला ‘चोरी चोरी छुपके छुपके’ असतो. त्यामुळेच लांबचे, निर्जन आडोसा असलेल्या ठिकाणाला पसंती मिळते. बागा, समुद्रकिनारे या जोडप्यांना थोडासा एकांत, निवांतपणा आणि मोकळेपणा पुरवतात. पण अखेर या जागा सार्वजनिकच असतात. भिकारी, तृतीयपंथी, आंबटशौकीन तरुण (आणि प्रौढसुद्धा!) आणि यांच्या जोडीला पोलीस, सुरक्षारक्षक आदींचे भय कायमच डोक्यावर असते. या प्रेमी जोडप्यांची ‘अडचण’ मल्टिप्लेक्सनी बरोबर ओळखली. ‘कपल सिट’ने जोडप्यांच्या सगळ्याच अडचणी दूर केल्या.
या कपल सिट्सची रचना इतर आसनांपेक्षा वेगळी असते. त्यांच्या भोवती बॉक्स असतो. त्यामुळे इतर प्रेक्षकांना आत बसलेली जोडपी दिसत नाहीत. तसेच आतमध्ये दोन खुच्र्याऐवजी एक सोफा असतो. तीन तास वातानुकुलीत वातावरण, कुणी बघण्याची भीती नाही आणि पूर्ण एकांत जोडप्यांना मिळतो. त्यामुळे प्रेमी जोडप्यांकडून या कपल्ससीटला जोरदार मागणी असते. मल्टिप्लेक्स घराच्या जवळ असले तरी फारसे बिघडत नाही. जाण्यायेण्याचा वेळही वाचतो. त्यातून मल्टिप्लेक्सेसमध्ये दिवसभर शो असतात. तुलनेने गर्दीही कमी असते. त्यातही कपल सीट म्हणजे पर्वणी ठरते.   
काही वर्षांपूर्वी मुंबईत वातानुकुलीत बसेस सुरू झाल्या. त्याला पडदे असत. जोडप्यांनी हा नवीन अड्डा शोधला होता. या बसमध्ये बसून शेवटच्या थांब्याचे तिकिट काढायचे आणि शेवटच्या सीटवर जाऊन बसायचे. एकदा तिकिट काढल्यावर बसवाहक मागे फिरकत नसे. पडदे असल्याने प्रायव्हसीसुद्धा मिळायची. ती सोय बंद झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.
तरुण मंडळींमध्ये हल्ली पुरेसा मोकळेपणा असतो. त्यामुळे एखाद ग्रूप चित्रपटाला एकत्र गेला तरी ‘ते दोघे’ कपल सिटचे वेगळे तिकीट काढतात. जाता-येताना सगळ्यांसोबत आणि सिनेमा बघायला कपल सीटवर असा प्रकार राजरोस चालतो. मल्टिप्लेक्समध्ये अनेकदा कपल सिटवर जाऊन चित्रपट पाहणाऱ्या अवंतिका आणि जीत (दोघांची नावे बदललेली) यांनी सांगितले की, बॅण्ड स्टँडवर किंवा मरिन ड्राईव्हवर बसणे खूप त्रासदायक असते. आजूबाजूच्या लोकांचा त्रास असतो, कुणी बघत तर नसेल ना याचा सतत दबाव असतो, कुणी आपले फोटो तर काढत नाहीना याचीही भीती असते. अशा वातावरणात बोलणार काय आणि प्रेम करणार काय. परंतु कपल सिटमध्ये निवांतपणा मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा