खांदा कॉलनी येथील शिव मंदिराच्या आवारात सकाळच्या प्रहरी विद्यार्थी गणवेशातील प्रेमीयुगुलांच्या सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांमुळे मंदिरातील प्रवेशापूर्वीच शिवभक्तांना शिव.. शिव.. शिव.. म्हणण्याची वेळ आली आहे. या प्रेमीयुगुलांना हटकणाऱ्या आणि उपदेशाचे डोस पाजणाऱ्या भक्तांना त्यांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे.
खांदा कॉलनी येथील प्रसिद्ध शिव मंदिराच्या परिसरात प्रेमीयुगुलांनी उच्छाद मांडला आहे. मंदिरात दर्शनासाठी व मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्यांना नागरिकांना शरमेने मान खाली घालून त्यांच्या शेजारून आपली फेरी पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मंदिरालगत असणाऱ्या तळ्याच्या परिसराचे सिडकोने सुशोभीकरण करून रहिवाशांना शतपावली करण्यासाठी ट्रॅक तसेच योगासने करण्यासाठी बाके बसविली आहेत. मात्र या बाकांचा ताबा या प्रेमीयुगुलांनी घेतला आहे. तसेच येथील झुडपांचा आडोसा घेऊन विद्यार्थी आपल्या गळाभेटीचा कार्यक्रम नित्यनियमाने पार पाडत असल्याने नागरिकांवर स्वत:चे डोळे झाकण्याची वेळ आली आहे. मंदिरानजीक शाळा, महाविद्यालये जवळ असल्याने हे मंदिर गाटीभेटींसाठी विद्यार्थ्यांचे मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. तसेच येथे पोलिसांची विचारणा होत नसल्याने ते त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे ठिकाण मानले जाते.
खांदा कॉलनीतील या मंदिरापासून काही अंतरावर सीकेटी, महात्मा, पिल्लईसारखी महाविद्यालये आहेत. घरी आई-बाबांना महाविद्यालयात शिकण्यासाठी जातो असे सांगून निघालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी पाटील दाम्पत्याने या अशा कृत्याचा जाब विचारल्यावर ही मंडळी पाटील दाम्पत्याला आम्ही नव्या दमाची भावी पिढी असल्याचे कारण सांगून स्वत:च्या व्यक्तिस्वातंत्र्याचे धडे देऊ लागले. सकाळी या परिसरात पोलिसांचा फेरा झाल्यास या सामूहिक अश्लीलता पसरविणाऱ्या विकृतींवर कारवाई होईल अशी माफक अपेक्षा पाटील दाम्पत्याने व्यक्त केली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. आर. थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खांदेश्वर पोलिसांनी उद्यानामध्ये व मंदिर परिसरात अश्लील चाळे करत बसलेल्या पाच जणांवर यापूर्वीच कारवाई केलेली आहे. मी स्वत: त्या उद्यानात फेरफटका मारायला जातो. उद्यानात बसणे हा गुन्हा नसून सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे हा गुन्हा आहे.
मात्र यामध्ये पालकांची जागरूकता महत्त्वाची आहे. आपली मुलगी किंवा मुलगा शाळा-कॉलेजच्या वेळेत नेमका कुठे जातो यावर पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. आम्ही कारवाई केल्यानंतर हेच पालक माझा मुलगा दोषी नसल्याचा तगादा लावतात. त्यामुळे यापुढे संबंधित ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात येईल, मात्र कारवाई वेळी मुलांसोबत पालकांनाही पोलीस ठाण्यात आणून समज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader