बहीण-भावाच्या नात्यामधील स्नेह आणि प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून दूरदेशी, परदेशामध्ये राहणाऱ्या आपल्या भावांना वेळेत राखी पोहचविण्यासाठी तमाम भगिनींची धडपड सुरू आहे. रक्षाबंधनापूर्वी भावाच्या हाती राखी पडण्याचा खात्रीशीर उपाय म्हणून हल्ली टपाल खात्यापेक्षा कुरिअर सेवेवर जास्त विश्वास ठेवला जात आहे. राखीपौर्णिमेच्या सणाची ही निकड लक्षात घेऊन कुरिअर कंपन्यांनीही आपल्या दराची दोरी ताणली असून खास राखीसाठी एरवीपेक्षा दुप्पट अथवा तिप्पट दर आकारले आहेत. त्यामुळे दहा-पंधरा रुपयांची राखी पाठविण्यासाठी आता दीडशे, दोनशे तर परदेशी पाठविण्यासाठी तर चक्क हजार रुपये मोजावे लागत आहेत. कुरिअर कंपन्यांचे कामही राखीपौर्णिमेच्या निमित्ताने ४० टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून आले आहे. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने बहिणीने भावाच्या घरी जाऊन त्याला राखी बांधणे अपेक्षित असले तरी सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वानाच ते शक्य होत नाही. अनेकांचे भाऊ दूरदेशी अथवा परदेशात राहत असतात. त्यामुळे कुरिअरद्वारे राखी पाठविणे हाच एक पर्याय उरतो. आता सोशल मीडियामुळे टपालाद्वारे पत्र पाठविणे कालबाह्य़ झाले असले तरी राखी मात्र पारंपरिक पद्धतीने पाकिटात घालूनच पाठवावी लागते. त्यामुळे राखीपौर्णिमेच्या आधी आठ-दहा दिवस कुरिअर कंपन्यांची चंगळ असते. राखी वेळेत पोहोचण्याच्या हमी देतानाच कुरिअर कंपन्यांनी त्यांचे दर दुप्पट अथवा तिपटीने वाढवले आहेत. एरवी विविध कुरिअर कंपन्या ८० ते १०० रुपयांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांमध्ये सेवा देतात. अगदी दुसऱ्याच दिवशी राखी पाठविण्यासाठी कुरिअर कंपन्यांनी खास एक्स्प्रेस सेवा सुरू केली असून त्यासाठी दुप्पट म्हणजे २०० ते २५० रुपये आकारले जात आहेत. दुबईमध्ये ४८ तासांत राखी पाठवण्यासाठी काही कंपन्या ४५० ते ५०० रुपये आकारतात तर अमेरिका आणि युरोपमध्ये तीन ते चार दिवसांत हमखास राखी पोहोचविण्यासाठी कुरिअर कंपन्या ९५० ते १००० रुपये आकारतात. मात्र भावाचे प्रेम पैशात तोलता येत नसल्याने १५ रुपयांच्या राखीसाठी महिला आनंदाने कैकपट अधिक रक्कम आनंदाने मोजत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा