मंगळवारी रामनवमीनिमित्त सुट्टी असतानाही घोडपदेवचा फेरबंदर नाका गजबजून गेला होता. एरवी फारशी वर्दळ नसलेल्या या नाक्यावर घोडबंदर, भायखळा, माझगाव परिसरातील शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते. डीजेवर सुरू असलेल्या शिवसेनेच्या निवडणूक गीतावर ते ठेका धरत होते. सुमारे दोनएकशे शिवसैनिकांचा ताफा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांची प्रतीक्षा करीत होता. तेवढय़ात रिपाईच्या काही महिला कार्यकर्त्यां या ताफ्यात सहभागी झाल्या. कुणीतरी त्यांच्या डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवा स्कार्फ घातला. निळ्या टोप्यांची व्यवस्था का केली नाही, असा थोडा तिखट प्रश्न त्यांनी शिवसैनिकांना केला. पण शिवसैनिकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. हे काय चालले आहे याचा अंदाज विभागातील रहिवाशी घेत होते. तेवढय़ात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले भलेमोठे धनुष्यबाण मिरवत महायुतीचा विजय रथ आला आणि येथून निवडणूक प्रचारफेरी काढण्यात येणार असल्याचा उलगडा परिसरातील नागरिकांना झाला.
सकाळी दहा-सव्वादहाच्या सुमारास अरविंद सावंत आले आणि तासभर खोळंबलेल्या शिवसैनिकांची प्रतीक्षा संपली. कार्यकर्त्यांनी न्याहारी केली का याची विचारपूस करीतच अरविंद सावंत अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासह विजय रथामध्ये विराजमान झाले आणि ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा देत प्रचारयात्रा मार्गस्थ झाली. ढोल-ताशाच्या गजराचा आवाज ऐकून मोडकळीस आलेल्या चाळींतील खिडक्यांमधून रहिवाशी डोकावत होते. त्यांना अभिवादन करीत फेरबंदर नाक्यावरून रामभाऊ भोगले मार्गावरून प्रचारयात्रा पुढे सरकत होती. न्यू हिंद मिल म्हाडा कम्पाऊंडच्या प्रवेशद्वारात फटाक्यांची आतशबाजी झाली. पण येथील रहिवाशांना प्रवेशद्वारातूनच अभिवादन करून प्रचारयात्रा पुढे गेली. येथील रहिवाशांनादेखील प्रचारयात्रेबद्दल फारशी उत्सुकता नसल्याचे जाणवले.
मतदारांना अभिवादन करीत प्रचारयात्रा पुढे सरकत होती. मध्येच एखाद्या चाळीतील दोन-तीन महिला अरविंद सावंत यांना ओवाळत होत्या. नाक्यानाक्यांवर हार घालून अरविंद सावंत यांचे स्वागत होत होते. मुख्य चौकांमध्ये शरद पोंक्षे आपल्या खर्जातील आवाजात महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. ६६ वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने भ्रष्टाचाराशिवाय काही केले नाही. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. त्यामुळे देशाला आजघडीला कणखर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून आपले मत अरविंद सावंत यांच्या पारडय़ात टाका, असे आवाहन करतानाच, गेल्या वेळी केलेली चूक सुधारा, अन्यथा पुढील पाच वर्षे मदतीसाठी शिवसेनेच्या शाखेत येऊ नका सल्ला शरद पोंक्षे मतदारांना देत होते.
एव्हाना उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या होत्या. प्रचारयात्रेतील रथातून पाण्याने भरलेल्या ग्लासचे कार्यकर्त्यांना वाटप होत होते. संत सावता मार्ग, डॉ. आंबेडकर रोड, शेठ मोतीशाह लेन, लव्हलेन, डॉ. मस्करान्स रोड आदी परिसरातून प्रचारयात्रा फिरत होती. मुख्य रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रचारयात्रेकडे पाहायलाही पादचाऱ्यांना वेळ नव्हता, तर वाहतुकीला अडचण होत असल्याने अनेक वाहनचालक नाराज झाल्याचे दिसत होते.
भायखळ्याच्या रामनगरमधील शिवसैनिकांनी अरविंद सावंत यांना आग्रहाने रथावरून उतरविले आणि महिलांनी त्यांचे औक्षण केले. रामनगर चाळीत येण्याचा आग्रह काही स्थानिकांनी धरला होता. वेळ कमी असल्याने महापालिका निवडणुकीसारखा प्रचार करून चालणार नाही. अन्यथा काही भागात पोहोचता येणार नाही, असे कारण पुढे करीत शिवसैनिकांनी अरविंद सावंत यांना रथावर चढविले आणि प्रचारयात्रा पुढे निघाली. यामुळे रामनगरमधील रहिवाशी मात्र हिरमुसले. माझगावच्या नारळवाडीत मात्र अरविंद सावंत पदयात्रा करीत गेले. परंतु साताठ घरे वगळता त्यांना तेथे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रथाकडे परतल्यानंतर शरद पोंक्षे यांनी निरोप घेतला आणि अरविंद सावंतांची प्रचारयात्रा पुढे सरकली. प्रचारयात्रा संत सावता मार्ग, मुस्तफा बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शेठ मोतीशाह लेन, मापलवाडी, डॉ. मस्करान्हस रोडवरून माझगावमध्ये दाखल झाली. ठिकठिकाणी अरविंद सावंत यांना महिला औक्षण करीत होत्या, तर अनेक जण हार घालून त्यांचे स्वागत होत होते. ‘आपला माणूस भेटीला आल्या’च्या घोषणेने प्रचारयात्रा दणदणून गेली होती. काही चाळींमधील रहिवाशांना उमेदवाराकडे आपली गाऱ्हाणी मांडायची होती, पण केवळ हस्तांदोलन करून अरविंद सावंत पुढे जात असल्याने रहिवाशी हिरमुसत होते.  दलितांची मोठी संख्या असलेल्या लव्हलेनमध्येही अरविंद सावंत यांचे जंगी स्वागत झाले. तेथील बुद्धविहारात जाऊन अरविंद सावंत यांनी बुद्धवंदनाही केली. दुपारी १ च्या सुमारास माझगावमध्ये या प्रचारयात्रेची सांगता झाली.