पट्टेरी वाघाने हल्ला केल्याने गाय जीवाला मुकल्याचा प्रकार दाजीपूर अभयारण्यात उघडकीस आला. त्याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. पण वाघाने मयत गायीचा वास घेऊन बाजूला गेल्याने तो सापडू शकला नाही. या प्रकारामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये दाजीपूर अभयारण्य आहे. गव्यासाठी हे अभयारण्य सर्वदूर परिचय आहे. दाजीपूर गावात राहणाऱ्या शांताराम पाटील यांच्याकडे काही जनावरे आहेत. ती चरण्यासाठी उगवाई देवीच्या मंदिराकडे गेली होती. तेव्हा एका पट्टेरी वाघाने एका गायीला कळपातून ओढून नेऊन ठार केले. या वाघाने गायीचे पुष्कळसे मास खाल्ले होते. त्यानंतर तो निघून गेला होता.
ही माहिती शांताराम पाटील यांनी वनक्षेत्रपाल महेश परब यांना दिली होती. परब व त्यांचे सहकारी दाजीपूर अभयारण्यातील देवीच्या मंदिराजवळ पोहोचले. त्यांनी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचला. मृत गायीचे मांस त्यांनी सापळ्यात ठेवले होते. ते खाण्यासाठी वाघ सापळ्याजवळ आला होता. पण मांस हुंगून तो लांबूनच निघून गेला. वाघाचे छायाचित्रण करण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची योजना केली होती. मात्र पाऊस व अंधारी वातावरणामुळे वाघाची प्रतिमाच फक्त दिसून आली. तेथे असलेल्या ठशांवरून तो वाघ असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचा उपद्रव नागरिक व जनावरांना होणार नाही, यासाठी दक्षता घेणार असल्याचे वनक्षेत्रपाल परब यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
दाजीपूर अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू
पट्टेरी वाघाने हल्ला केल्याने गाय जीवाला मुकल्याचा प्रकार दाजीपूर अभयारण्यात उघडकीस आला. त्याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचला होता.
First published on: 22-08-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cow died in attack of tiger in dajipur sanctuary