शहरात पुरेशा नागरी सुविधा न देता मालमत्ता कराची वसुली, विशिष्ट काळात आणि अपेक्षित योजनांवर खर्च न केल्याने वर्षांकाठी परत जाणारे लाखो रुपये अशा अनेक आक्षेपार्ह बाबींचा ऊहापोह करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महापालिका आयुक्तांना धारेवर धरले आहे. २०१० ते २०१३ या कालावधीत तब्बल दहा निवेदने दिल्यानंतरही ढिम्म राहिलेल्या महापालिकेच्या कारभाराविरुद्ध २२ एप्रिलपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरी सुविधांविषयी तीन वर्ष आम्ही महापालिकेकडे अर्ज, विनंती पाठपुरावा करीत आहोत. गेल्या प्रजासत्ताक दिनापर्यंत याविषयी कार्यवाही व्हावी, रस्ते, पाणी, पुरवठा, मनपा शाळा, हिवताप फवारणी, कोंडवाडा, शहर बस, गटारींचे उघडे ढापे या सर्वाविषयी ठोस कार्यवाही व्हावी असे पत्राव्दारे पक्षाने कळविले होते. मात्र अजूनही फाशीपूल ते दसेरा मैदान, पाण्याची टाकी ते मोहाडी उपनगर, गुरूव्दारा ते मोहाडी, मच्छिबाजार ते वडजाई रोड हे रस्ते, कोंडवाडा, पाणीपट्टी कमी करणे, हिवताप फवारणी, मनपा शाळा, अतिक्रमण, हॉकर्स झोन आदी बाबतीत काहीही प्रगती झालेली नाही. दसेरा मैदान चौक विस्तारित करणे व चक्कर बर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे तीव्र वळण दूर करून वेळोवेळी होणारी कोंडी टाळणे याविषयीही पक्षाने मागणी केली आहे. फाशीपूल ते दसेरा मैदान चौकापर्यंतच्या रस्त्याची निविदा काढून दीड कोटी रुपये गेली दोन वर्षे पडून आहेत. मात्र कामाला सुरुवात नाही.
सुधारणा होत नाहीत तोपर्यंत मालमत्ता कर न भरण्याचे आवाहन पक्षाने नागरिकांना केले आहे. २१ एप्रिलपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने नागरी सुविधांबाबत कारवाई न केल्यास २२ एप्रिलपासून संपूर्ण शहरामध्ये जनआंदोलन व संघर्ष छेडण्यात येईल असा इशारा श्रावण शिंदे, एल. आर. राव, रमेश पारोळेकर, हिरालाल सापे, साहेबराव पाटील यांनी दिला आहे.

Story img Loader