औशातील फटाक्याच्या कारखान्यात शॉर्टसर्कीटने आग लागून मालक व कामगार असे दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.
आग विझविण्यास अग्निशामक दलाला पाचारण केले होते. परंतु मोटारीला पाण्याचा पाईप नसल्याने मोटारीतील पाण्यावरच आग विझवावी लागली. औशातील काझीगल्लीत शमी उल्ला शेख यांचा फटाक्याचा कारखाना आहे. या कारखान्यात शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण के ले. त्यामुळे या भागातील लोकांची धावपळ उडाली. आग लागली, त्यावेळी कारखान्यात मालक शमी उल्ला शेख (वय ४५) व कामगार वाजीद शेख (वय २४) फटाके तयार करण्याचे काम करीत होते. हे दोघेही आगीत गंभीररीत्या भाजले. आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले. जखमींना औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या नवीन मोटारीला पाईप नसल्याने घरगुती नळाचे पाईप नागरिकांनी गोळा केले. तोपर्यंत लोकांनी मोटारीतील पाण्याचा वापर व घरातील पिण्याच्या पाण्यासह इतर पाण्याचा वापर आग विझविण्यासाठी केला. यानंतर घरगुती पाईपने आग विझवली गेली. काही वेळाने दाखल झालेल्या अग्निशामक दलाने आग विझविण्यात यश मिळविले.