दीपावली म्हणजे प्रकाशोत्सव..फटाक्यांची आतिषबाजी..भारतीय संस्कृतीमधील ‘सणांचा राजा’ म्हणून महत्व असलेल्या दीपावलीत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास आनंदाच्या या सणाचे रूपांतर दु:खातही होऊ शकते. फटाके विक्री करण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांची यादी बघितल्यास विक्रेत्यांनी त्यातील काही नियमांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे. फटाक्यांच्या स्टॉल मांडणीपासूनच नागरिकांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा करण्याची सुरूवात महापालिका आणि अग्निशामक दलानेही केली असून न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत असूनही कारवाई होत नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
महापालिकेने परवानगी दिलेल्या फटाके विक्रेत्यांसाठी न्यायालय आणि शासनाकडून वेगवेगळ्या अटी व शर्ती आहेत. त्यात दीड अंश वजनापेक्षा जास्त वजनाचे दोरीने बांधलेले व कागदात गुंडाळलेले गोळे, सुतळी बॉम्ब किंवा २.२५ इंचापेक्षा जास्त व्यासाचे अ‍ॅटमबॉम्ब, तीनचतुर्थाशपेक्षा जास्त वजन व दीड इंचापेक्षा जास्त लांब, पाऊण इंचापेक्षा जास्त व्यासाचे अ‍ॅटमबॉम्ब, चॅम्पियन, गन पावडर नायट्रेटमिश्रीत परंतु, क्लोरेट नसलेले फटाके, फुटफुटी किंवा तडतडी म्हणून ओळखले जाणारे पिवळ्या फॉस्फरसयुक्त विषारी फटाके, शार्ट व अलार्म कोर्स, अशा प्रकारच्या फटाक्यांवर बंदी टाकण्यात आलेली आहे. फटाके उडविणाऱ्या जागेपासून चार मीटपर्यंत १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन व विक्रीवरही बंदीचा समावेश आहे.
दुकानात ५० किलोग्रॅम फटाके व ४०० किलोग्रम चायनीज क्रॅकर (शोभेचे फटाके) यापेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. फटाक्यांच्या दोन दुकानांमध्ये तीन मीटरपेक्षा कमी अंतर नसावे, एकाच ठिकाणी एकाहून अधिक दुकाने असतील तर त्यांचे प्रवेशद्वार समोरासमोर नसावेत. अशा ठिकाणी १०० पेक्षा अधिक दुकाने नसावेत, विक्रीच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ तसेच धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. विद्युत प्रवाह सुरक्षित आहे की नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे नमूद करण्यात आले आहे. विक्रीच्या ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना बंधनकारक आहे. अग्निशामक दलाच्या अटींमध्ये विक्रेत्याने २०० लिटर पाण्याचा साठा करणे आवश्यक आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे.
विना परवाना फटाके विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. फटाके विक्रेत्यांना अशा प्रकारे वेगवेगळ्या नियमांचे बंधन घालण्यात येत असले तरी त्यांचे काटेकोर पालन होतांना दिसत नाही. यात सर्वाधिक महत्वाचे म्हणजे समोरासमोर विक्री, परस्परांमध्ये असलेले किमान अंतर, २०० लिटर पाण्याचे साठे, वाळूने भरलेल्या आग विझविण्याच्या बादल्या, धुम्रपान निषेधाचे फलक, या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे डोंगरे वसतीगृह मैदानावरील फटाके बाजारात आढळून येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

Story img Loader