शहरातील इम्पिरिअल चौकाजवळच असलेल्या ‘राजासाब वाईन्स’लगत सोमवारी रात्री छापा टाकण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून तेथील अवैध दारू जप्त करण्यात आडकाठी आणली गेली. कोतवाली पोलिसांनी यासंदर्भात चौघांना अटक केली. नंतर त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
गेल्या आठवडय़ातच पत्रकार चौकात एका महिला पोलिसास दमदाटी करण्याचा प्रकार घडला होता. काल रात्रीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी कारवाई टाळण्यासाठी कोतवाली पोलिसांवर दबाव आणल्याची चर्चा आज दिवसभर शहरात सुरू होती. रात्री उशिरा पोलीस ठाण्यात बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.
योगेश रमेश सुरसे (२७, टिळक रस्ता, नगर), सुनील सदाशिव बोंडगे (३०, पानसरे गल्ली), राकेश सुभाष साळुंके (२५, माळीवाडा) व अतुल भगवान महानूर (३०, माळीवाडा) या चौघांना काल रात्री पोलिसांनी अटक केली. नंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर आज हजर करण्यात आले, त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे यांनी फिर्याद दिली आहे. करपुडे यांना पुणे रस्त्यावरील ‘राजासाब वाईन्स’लगतच्या भिंतीमागे हिरव्या रंगाचे कापड लावून दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. चौघा कर्मचा-यांसमवेत त्या तेथे छापा टाकण्यासाठी गेल्या असता, तेथे उपस्थित असलेल्या चौघांनी त्यांना धक्काबुक्की करून दारूचा साठा जप्त करण्यास प्रतिबंध केला.
ही माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या शहरातील काही पदाधिका-यांनी घटनास्थळी व नंतर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवडय़ात महिला पोलीस कर्मचाऱ्यास दमदाटी केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हय़ात अक्षय कर्डिले याला तोफखाना पोलिसांनी अद्यापि अटक केलेली नाही.
इम्पिरिअल चौकाजवळ छाप्याने खळबळ
शहरातील इम्पिरिअल चौकाजवळच असलेल्या ‘राजासाब वाईन्स’लगत सोमवारी रात्री छापा टाकण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून तेथील अवैध दारू जप्त करण्यात आडकाठी आणली गेली.
First published on: 04-12-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Create a sensation of raid near imperial chowk