भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. कृषी उत्पादनात भरपूर प्रगती केल्यानंतरही कुपोषणाची समस्या कायम आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आपणास पौष्टिक पिके व पशुधन यावरच भर द्यावा लागेल. कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेती संशोधक डॉ. स्वामीनाथन यांनी अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठातील दीक्षांत समारोहात बोलताना केले.
शेतकऱ्यांचे जीवन उंचावण्यासाठी अल्पभूधारकांचे उत्पादन व नफा वाढविणे व त्याद्वारे उपासमार व दारिद्रय़ कमी करणे हे मोठे योगदान ठरेल तसेच कुपोषण व उपासमार मुक्त भारत निर्माण करण्यासाठी कुठलीही तडजोड नको, ते आमचे एक ध्येय असायला हवे, असे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसमोर डॉ. स्वामीनाथन म्हणाले. जोवर आपण उत्पादन वाढविणे, नफा व शाश्वत शेती यांना चालना देणार नाही तोवर देशात अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या शेतमालास किमान आधारभूत किंमत मिळाली तर त्याला प्रोत्साहन मिळेल शेतमालाचे भाव ठरविताना जागतिक संघटनेचे नियम आडवे येऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारचे नियम लावायचे असतील तर विदेशात ज्याप्रमाणे शेतक-यांना अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे भारतातही प्रगत देशातील ग्रीन योजना कार्यान्वित करून शेतक-यांना अनुदान  देण्यात यावे. २०१६ हे वर्ष डाळवर्गीय पिकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे होणार आहे. या वर्षांत  आम्हाला डाळीची मागणी व पुरवठा यातील अंतर कमी करावे लागणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी चालना दिल्याप्रमाणे आम्हाला आमच्या देशातील शेतीचा विकास करावा लागेल, असेही ते म्हणाले.
गेल्या ५० वर्षांत कृषी क्षेत्रात बरेच परिवर्तन झाले आहे, पण अजूनही कृषी क्षेत्र हे व्यापक असे असंघटित क्षेत्र आहे. सातत्याने प्रगती व प्रयत्न केल्यानंतर सुद्धा हे असे झाले आहे. आजच्या पदवीधारक विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील ६० कोटी शेतक-यांचे चित्र डोळयासमोर आणा तेव्हा स्थिती भीषण असल्याचे दिसेल. यापुठे तुम्ही असे काम करा की त्यामुळे अनेकांच्या चेह-यावर आनंद बघाल, असे महान संशोधक डॉ. यशवंतराव थोरात या दीक्षांत समारोहात बोलताना म्हणाले.  प्रारंभी कुलगुरू डॉ. रवीप्रकाश दाणी यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाने  काय प्रगती केली याचे धावते वर्णन केले. विविध विषयात पदवी अथवा पदव्युत्तर  शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देण्यात आलीत. शेवटी पसायदान व राष्ट्रगीताने या समारंभाची सांगता झाली. राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या समारंभाकडे पाठ फिरवली.

Story img Loader