दोन महिन्यांपूर्वी अफरोज मुश्ताक या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात तिस-या वर्षांत शिकणा-या युवकाने सर्वात छोटी ‘बाईक’ बनविली. दुचाकीचा आकार १० बाय १०. वजन ४.६ किलो. अनेक वैशिष्टय़ांसह ८० किलोचे वजन पेलणा-या या बाईकची मोठी चर्चा झाली. पण अशा नवनव्या प्रकारच्या बाईक तयार केल्यानंतर त्याचे पेटंट आपल्या नावे असावे, यासाठी मात्र त्याची ससेहोलपट सुरू आहे. नावावर पेटंट करण्यासाठी ५० हजार रुपये खर्च होतात, असे त्याला सांगितले जात आहे. पेटंट अर्जाचे शुल्क तसे कमी असले तरी यासाठी विधिज्ञांना मोठी रक्कम द्यावी लागते. ती खूपच अधिक असल्याने चांगले संशोधन त्याला त्याच्या नावावर करता येत नाही.
एकदा सहज संगणकावर सगळय़ात छोटय़ा गाडीची माहिती त्याने मिळविली. ती संतोष कुमार या व्यक्तीने तयार केली होती. यापेक्षा छोटी बाईक तयार करता येईल का, असा विचार सुरू झाला आणि ऑगस्ट २०१३ मध्ये अफरोजने छोटय़ा दुचाकीसाठी लागणारे साहित्य गोळा करायला सुरुवात केली. छोटय़ा मुलांच्या सायकलमध्ये वापरले जाणारे बरेचसे साहित्य त्याने मिळविले. चाक शोधले आणि बाईकसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञानही त्याने स्वत:च विकसित केले. त्याच्या या सर्वात लहान दुचाकीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली. तसे प्रमाणपत्रही त्याला दिले. त्याने गिनीज बुक आणि लिम्का बुकमध्ये या विक्रमाची नोंद व्हावी, यासाठीही प्रयत्न केले. पण त्यासाठी लागणारी रक्कम खूप अधिक असल्याने हा नाद सोडला.
अफरोजचे वडील मुश्ताक शेख औरंगाबादच्या उस्मानपुरा भागाचे पोस्टमास्तर आहेत. आई गृहिणी आहे. मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थिती असल्याने केलेल्या संशोधनासाठी पेटंट आणि झालेल्या विक्रमांची नोंद करण्यासाठी लागणारा पैसा अफरोजकडे नाही. अशा नोंदी वर्गणी गोळा करून करायच्या नसतात, असे तो आवर्जून सांगतो. नोव्हेंबर २०१३ मध्ये त्याने केलेली सर्वात छोटी बाईक अनेकांनी पाहिली तेव्हा त्याचे मोठे कौतुक झाले. त्याच्या दुचाकीवर मोबाइलदेखील चार्ज करता येतो. आकाराने लहान असलेली ही दुचाकी मोठय़ा माणसाला चालवता येते, हे अफरोज आवर्जून सांगतो. दुचाकीवर बसून एक चक्करही मारून दाखवतो. दुचाकीचे स्टॅण्ड काढल्याशिवाय ती चालू करता येत नाही. ही दुचाकी तयार करण्यासाठी त्याने ६ हजार रुपये खर्च केले आहेत. ही दुचाकी बॅटरीवर चालते. अशीच एक दुचाकी त्याने सौरऊर्जेवरची केली आहे. ती आकाराने अधिक मोठी आहे. पण त्याच्या नवोपक्रमाची तशी फारशी कोठी दखल घेतली गेली नाही. महाविद्यालयात आणि सरकारी पातळीवर त्याचा ना सत्कार झाला, ना कौतुक. पण त्याने तयार केलेली दुचाकी आहे मोठी अफलातून. त्याचे पेटंट आपल्याकडे असावे, असे अफरोजला वाटते. ते मिळविण्यासाठी तो धडपडतोय.
सर्वात छोटी बाईक बनविणा-याची ‘पेटंट’साठी धडपड!
दोन महिन्यांपूर्वी अफरोज मुश्ताक या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात तिस-या वर्षांत शिकणा-या युवकाने सर्वात छोटी ‘बाईक’ बनविली.
आणखी वाचा
First published on: 10-02-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creating the small bike struggling for patent