*        नाशिक महापालिकेचा दावा
*        सद्यस्थितीत शहरात २५ ते ३०  हजार मोकाट कुत्रे
भाभानगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातल्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काही केल्या कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले असतानाच महापालिकेने सद्यस्थितीत शहरात २५ ते ३० हजार भटके कुत्रे असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापैकी सहा वर्षांत ३६ हजार ७३२ कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. पालिकेचा अंदाज आणि निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या पाहता, शहरातील एकुण कुत्र्यांच्या संख्येपेक्षा अधिक कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करण्याची करामत पालिकेने केली आहे. महत्वाची बाब म्हणजे, या कामासाठी थोडे थोडके नव्हे तर, तब्बल दोन कोटी ५८ लाख रूपयांहून अधिक खर्च केल्याची बाब माहितीच्या अधिकारान्वये दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.
भाभानगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने तीन बालकांचा चावा घेऊन सहा महिन्याच्या चिमुरडीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. बाळाच्या आईने धैर्य दाखविल्याने चिमुकल्याची कुत्र्याच्या तावडीतून सुटका होऊ शकली. या घटनाक्रमामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून त्यांना लगाम घालण्यात पालिकेची यंत्रणा अपयशी ठरली आहे. कित्येक वर्षांपासून कुत्र्यांवर निर्बीजीकरण केले जात असताना त्यांची वाढती संख्याही नियंत्रणात आलेली नाही, असे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर, सुनील ओसवाल यांनी महापालिकेकडे विचारणा केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे शहरवासीयांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. रात्रीच्या सुमारास त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. सद्यस्थितीत भटक्या कुत्र्यांची ही संख्या २५ ते ३० हजाराच्या घरात असल्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मागील सहा वर्षांत आतापर्यंत ३६ हजार ७३२ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यात १९,६३२ नर तर १७,१०० मादींचा समावेश आहे. शहरातील कुत्र्यांच्या एकूण संख्येविषयी पालिकेने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा सहा ते सात हजार अधिक कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे लक्षात येते. पालिकेच्या या दोन्ही आकडेवारीचा विचार केल्यास एक गोष्ट लक्षात येईल, की शहरात एकही असा मोकाट कुत्रा नसावा की ज्याची निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. २००७ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीतील माहिती पालिकेने दिली आहे. त्यात प्रारंभीच्या पाच वर्षांत या कामासाठी प्रत्येक वर्षी ५० लाखाची अंदाजपत्रकीय तरतुद करण्यात आल्याचे नमूद आहे. तर २०१२-१३ वर्षांत या कामासाठी ७५ लाख रूपयांची अंदाजपत्रकीय तरतुद करण्यात आल्याचे उत्तर पालिकेने दिले आहे. २०११-१२ या कालावधीत सर्वाधिक म्हणजे १०,१४८ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. एका कुत्र्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पालिका ७०० रूपये खर्च करते. आजवर ३६ हजार ७३२ कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन कोटी ५८ लाख ३६ हजार ५२० रूपयांचा खर्च करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.
एवढा प्रचंड निधी खर्च करूनही शहरातील कुत्र्यांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे लक्षात येते. यामुळे निर्बीजीकरण शस्त्रक्रियेचा कितपत लाभ झाला, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.