उपलब्ध क्षमतेचा कल्पकतेने उपयोग केल्यास विदर्भाचा विकास शक्य आहे. विदर्भाचे समृद्ध जंगलक्षेत्र लक्षात घेता पर्यटनाला मोठा वाव असून पाच लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. यातून नवीन अर्थव्यवस्था निर्माण होईल, असे प्रतिपादन भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीच्या विदर्भरंग दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना केले.
समारंभाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे आणि लॅमॉर अ‍ॅडव्हरटायझिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता गुर्जर तसेच महाव्यवस्थापक (स्पेस मार्केटिंग) बी.के. ख्वाजा आणि मुख्य वितरण व्यवस्थापक वीरेंद्र रानडे उपस्थित होते.
प्रसार माध्यम हे लोक शिक्षणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. लोकप्रबोधनातून लोकांना चांगली दिशा मिळावी, यातून लोकांना चांगल्या गोष्टी कळतील, हे प्रसार माध्यमांशिवाय शक्य नाही, असे सांगतानाच ‘लोकसत्ता’ने नवीन दृष्टीकोन स्वीकारून केलेल्या या उपक्रमाचे गडकरींनी कौतुक केले. विदर्भातील आर्थिक क्षमतेबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी विदर्भातील नेतेच जबाबदार आहेत. यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. आधी स्वत: आर्थिकदृष्टय़ा सक्षम बना आणि नंतर देशासाठी काम करा, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी बोलणे प्रभावी पाहिजे, विश्वसनीयता तर अत्यंत महत्त्वाची आहे, असेही गडकरी म्हणाले.
मी राजकारणी नाही. राजकारणात चांगल्या व सज्जन लोकांची गरज आहे. नागपूर हे देशाचे ‘टायगर कॅपिटल’ आहे. त्यामुळे विदर्भातील वनांकडे अधिक लक्ष दिले आणि ताडोबाचे जगभरात मार्केटिंग केले मोठय़ा संख्येने विदेशी पर्यटक येतील. यातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन मोठा महसूल मिळू शकतो, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी संगीता गुर्जर यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी विदर्भ ब्युरो चीफ विक्रम हरकरे यांनी विदर्भरंग दिवाळी अंकाविषयी भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शेखर सावरबांधे, सीएसी ऑलराऊंडरचे संस्थापक अमोल खंते, ज्येष्ठ सामाजिक विश्लेषक संध्या दंडे, प्रवीण गुर्जर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राम भाकरे यांनी केले.