संचालकपदाच्या अधिकाराचा दुरुपयोग करून आपल्या आदित्य बहुउद्देशीय संस्थेच्या इमारत बांधकामासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर करवून घेतले व जिल्हा बँकेचे व्याजासह साडेआठ कोटी रुपये थकवून बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांची पत्नी आदित्य संस्थेच्या पदाधिकारी सविता यांच्यासह चार जणांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, प्रशासकांच्या आदेशावरून मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच सारडा यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली असता सर्वच जण फरारी असल्याचे दिसून आले. सुभाष सारडा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असून, सर्वच पक्षांतील नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत. सारडा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. इतर बँकेच्या थकबाकीदार व बनावट कर्जदार दिग्गज पुढाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्हा सहकारी बँक मागील वर्षी आर्थिक अडचणीत सापडल्याने दिवाळखोरीत निघाली. बाराशे कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेच्या सर्व शाखांचे व्यवहार बंद पडल्याने सर्वसामान्यांचे पैसे अडकून पडले. संचालक असणाऱ्या नेत्यांनीच स्वत:च्या संस्थांना कोटय़वधींचे कर्ज घेतल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली. सरकारने बँकेवर अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ नियुक्त केले. मागील वर्षभरात बँकेत अधिकाऱ्यांपासून संचालक ते गावपातळीवरच्या सेवा सहकारी संस्थांमध्ये बनावट कर्जाची अनेक प्रकरणे तपासणीत समोर आली.
बँकेचे तब्बल तीन वेळा अध्यक्ष असलेल्या सारडा यांची पत्नी सविता या अध्यक्ष असलेल्या आदित्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या इमारतीसाठी २००८ ते २०११ दरम्यान बँकेतून कर्ज मंजूर करण्यात आले. या कर्जाची व्याजासह साडेआठ कोटी रुपये रक्कम थकीत आहे. ज्या उद्देशासाठी कर्ज उचलले, त्यासाठी ते वापरले नाही. प्रशासकांनी अनेकदा नोटिसा देऊनही सारडा यांनी कर्ज परत केले नाही. परिणामी प्रशासक अतिरिक्त जिल्हाधिकारी टाकसाळे यांच्या आदेशानुसार बँकेचे शरद ठोंबरे यांनी बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुभाषचंद्र सारडा, त्यांची पत्नी आदित्य बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सविता सारडा, संगीता शरद सारडा व सुनीता दिलीप सारडा या चौघांविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्री सारडा यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली असता निवासस्थानाला कुलूप दिसून आले. सारडा कुटुंबीय पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक वाल्मिक आव्हाळे यांनी सांगितले.

Story img Loader