खत कारखान्यात लोखंडी खोऱ्याने खत भरत असताना उघडय़ावरील केबल वायरचा विद्युत धक्का बसून एका कामगाराचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे वर्धमान फर्टिलायझर कंपनीच्या खत कारखान्यात ही दुर्घटना घडली. मात्र या प्रकरणी कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालकासह तिघाजणांविरुध्द मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविकांत रामचंद्र शहा, मनोजकुमार प्रवीणकुमार शहा व तानाजी ढवळे अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. रविकांत शहा यांच्या मालकीच्या वर्धमान फर्टलिायझर कंपनीच्या खत कारखान्यात संतोष भीमा कारंडे (वय ३०, रा. कोळेगाव, ता. मोहोळ) हा कामगार म्हणून सेवेत होता. तो कारखान्यात लोखंडी खोऱ्याने खत भरत असताना जवळच उघडयावरील दीड इंच जाडीची केबल वायर पडली होती. या केबल वायरीचा विद्युत धक्का बसल्याने संतोष कारंडे हा गंभीर भाजून जखमी  झाला. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मरण पावला. कंपनीचे मालक रविकांत शहा, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार शहा व व्यवस्थापक तानाजी ढवळे या तिघांनी केबल वायर उघडी ठेवून निष्काळजीपणा दाखविला आणि ते कामगार संतोष कारंडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद लक्ष्मण विठोबा गावडे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात नोंदविली.
पंढरपुरात रोकड पळविली
पंढरपुरात सावरकर चौकात विजय उत्तम जाडकर (रा. पापरी, ता. मोहोळ) हे आपली मोटारसायकल उभी करून मुलांसाठी खाऊ आणण्याकरिता बेकरीत गेले असता अज्ञात चोरटय़ाने त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतील एक लाख ६० हजारांची रोकड लंपास केली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. जाडकर हे पत्नीसह पंढरपुरात आले होते. चोरटय़ांनी त्यांच्यावर नजर ठेवून ही चोरी केली. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.