वैद्यकीय उपचारामध्ये हयगय केल्याने एका रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील ज्येष्ठ स्त्रीरोग तथा प्रसूतितज्ज्ञ डॉ. माधुरी दबडे व डॉ. राजीव दबडे या दाम्पत्यााविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुजाता एकनाथ हंचाटे (वय ४२, रा. चिरागभवन, जोडभावी पेठ, सोलापूर) असे मृत रुग्ण महिलेचे नाव आहे. गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास असल्याने सुजाता हंचाटे यांना त्यांचे पती एकनाथ हंचाटे यांनी किल्ला बागेसमोरील कृष्णामाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या २६ जानेवारी रोजी कृष्णामाई हॉस्पिटलच्या डॉ. माधुरी दबडे व डॉ. राजीव दबडे यांनी सुजाता यांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्याच देखरेखीखाली रुग्ण सुजाता यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात होते. परंतु त्याच दिवशी सायंकाळी त्यांच्या छातीत दुखून जास्त त्रास होत असतानादेखील डॉ. दबडे यांनी हयगय व निष्काळजीपणा दाखवून रुग्णाकडे दुर्लक्ष केले. वेळेवर उपचार न केल्यामुळे अखेर सुजाता यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ. माधुरी दबडे व डॉ. राजीव दबडे हे कारणीभूत असल्याबाबतची फिर्याद एकनाथ हंचाटे यांनी दिल्याने त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ात एका दोन वर्षांच्या आजारी मुलीवर वैद्यकीय उपचार करताना हलगर्जीपणा दाखविल्यामुळे या मुलीचे दोन्ही डोळे निकामी झाल्याबद्दल नवजात शिशू तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता डॉ. माधुरी दबडे व डॉ. राजीव दबडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे.