भंगार चोर ते अवजड वाहनांची दरोडेखोरी असा गुन्हेगारीचा प्रवास करुन कोटय़वधी रुपयांची मालमत्ता  करणाऱ्या तुपारी येथील पांडुरंग भगवान घाडगे याच्याविरुद्ध  झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार बठकीत सांगितले.
सागरेश्वर अभयारण्यानजीक अर्धा एकर क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या गोदामामध्ये पांडुरंग घाडगे याने राज्यभरातून चोरलेली वाहने मोडून भंगारात घालण्याचा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून सुरु ठेवला होता. उस्मानाबाद येथील एका टँकरचा जीपीएस प्रणालीमुळे शोध या ठिकाणी लागल्याने पांडुरंग घाडगे याचे कारनामे उघडकीस आले. या ठिकाणी असणाऱ्या परवेज खान (बंगळुरु) आणि इम्तियाज मुजावर (कोल्हापूर) या दोघांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर पांडुरंग घाडगे हाच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरु केली.
पोलीस उपअधीक्षक श्रीमती पौर्णिमा चौगुले यांनी गेले तीन दिवस कसून चौकशी केली असता घाडगे याच्या गोदामामध्ये ७ ट्रकचे इंजिन,शेकडो टायर्स, अ‍ॅल्युमिनियमच्या विद्युतवाहक तारा, कृषी वीज पंप, ठिबक सिंचनचे पाईप असा मोठय़ा प्रमाणात साठा सापडला. चौकशी करीत असताना आरोपी घाडगे व त्याच्या पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच घराची झडती घेत असताना घर पेटविण्याचाही प्रयत्न केला.
सागरेश्वर तुपारी या िखडीजवळ घाडगे याने गोदाम तयार केले असून या ठिकाणी जमिनीत खड्डा काढून वाहनांचे सुट्टेभाग पुरुन ठेवले होते. तेही पोलीस तपासात उघड झाले आहे. पांडुरंग घाडगे याचा मुलगा सुखदेव घाडगे हा ग्रामपंचायत सदस्य असून या घटनेनंतर तो फरार झाला आहे.  घाडगे विरोधात कुंडल पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, खंडणी मागणे आणि सावकारी करणे आदींबाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घाडगे आणि त्याच्या टोळीने पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर,उस्मानाबाद आदी जिल्ह्य़ातून वाहनांची चोरी करुन विल्हेवाट भंगारात लावली असल्याचे स्पष्ट होत असल्याने पोलीस संबंधित जिल्ह्य़ांच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडे चौकशी करीत आहेत. यासाठी पोलिसांची सहा वेगवेगळी पथके माहिती घेत असल्याचे अधीक्षक सावंत यांनी सांगितले.

Story img Loader