घरातून साठ तोळे सोने चोरीस गेले. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत तपास करून महिलेस अटक केली व मुद्देमाल जप्तही केला. मात्र, ८ तोळे सोनेच जप्त केल्याचे तपास यंत्रणेने फिर्यादीला सांगितले. परंतु फिर्यादीने याबाबत न्यायालयात दाद मागितली. त्याची दखल घेत न्यायालयाने पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक पाच पोलीस व वकील अशा आठजणांविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की शहराच्या सराफ लाइनमधील आनंद अग्रवाल यांच्या घरातून ६० तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची रीतसर फिर्याद गांधी चौक पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेस अटक केली व मुद्देमाल जप्तही केला. मात्र, तपास यंत्रणेने केवळ आठ तोळेच सोने जप्त केल्याचे फिर्यादीला सांगितले. परंतु फिर्यादीने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने गांधी चौक पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सूर्यकांत पाटील, उपनिरीक्षक नितीन चिंचोलकर, वकील अभय खानापुरे व पाच पोलिसांविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या सर्वाच्या विरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणी सूर्यकांत पाटील यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीवरून त्यांना निलंबितही करण्यात आले. मात्र, काही महिन्यांनंतर ते पुन्हा सेवेत रुजू झाले. आता नव्याने त्यांच्या विरोधात न्यायालयानेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Story img Loader