केडगाव परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उमेदवाराच्या पतीसह ८ जणांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडील ७२ हजाराची रोकड काल रात्री जप्त केली. या कारवाईत ७ लाख रुपये किंमतीची बोलेरो जीपही जप्त करण्यात आली आहे. या टोळक्याकडून एक धारदार चॉपरही हस्तगत करण्यात आला.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल रात्री ११ च्या सुमारास भूषणनगरमधील दूध डेअरीसमोर ही कारवाई केली. गणेश शंकर ननावरे (३५), जावेद अजीज सय्यद (२५), महेश बाळासाहेब मोरे (२१), शशिकांत नारायण कोरे (३८), सोमनाथ महादेव नानेकर (३०), बाबु अण्णासाहेब लाडकर (३५), जितेश सुधाकर शिंदे (२३) व महेश अशोक तरटे (२३, सर्व रा. शास्त्रीनगर, केडगाव) या आठ जणांना अटक करण्यात आली. शाखेचे मन्सूर सय्यद यांनी यासंदर्भात कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
शाखेचे सहायक निरीक्षक अशोक भालेराव, सय्यद, अतुल वाघमारे, योगेश गोसावी, शेख शकील, रमेश माळवदे, किरण बारवकर, सचिन जाधव, अशोक रक्ताटे यांचे पथक काल रात्री गस्त घालत असताना त्यांना एक बोलेरो जीप (एमएच १६ एटी ७१९२) संशयास्पद फिरताना आढळली, चौकशी करता त्यातील तरुण पोलिसांना पाहून पळू लागले, त्यांची झडती घेतली असता रोकड व धारदार चॉपर आढळले.
यातील गणेश ननावरे हा प्रभाग ३१ अ मधील मनसेच्या उमेदवाराचा पती असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. या आठही जणांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.