‘डिसअ‍ॅपिअरिंग डॉटर्स: स्त्रीभ्रूण हत्येची शोकांतिका’ हे गीता अरवामुदन यांचं पुस्तक पेंग्विन बुक्सनं २००७ मध्ये प्रकाशित केलं. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला असून मॅजेस्टिक प्रकाशननं ते २०१० मध्ये प्रकाशित केलं. स्त्रीभ्रूण हत्येच्या संदर्भातील वास्तव या पुस्तकानं उजेडात आणलं आहे.
पत्रकार असलेल्या लेखिका डॉ. गीता अरवामुदन प्रारंभी मनोगतात लिहितात, ‘स्वत:च्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा खून करणं, हा ठरवून पाठोपाठ केलेल्या ‘खून सत्राच्या’ जातकुळीतलाच गुन्हा आहे, पण मुलींना गर्भातच नष्ट करणं हा ‘समूळ नाश’ किंवा ‘र्निवश’ करण्यासाठी केलेल्या निर्घृण हत्याकांडासारखा प्रकार आहे. ‘स्त्री’ ही माणसाची एक प्रजातीच त्यामुळे नष्ट होत चाललेली आहे. पुरुष आणि स्त्री अशा दोन मुलभूत लिंगाच्या माणसांपैकी स्त्री लिंगाची माणसं नष्ट होत चालली आहेत!
हा गुन्हा अतिशय शांतपणे, बिनबोभाट आणि थंड डोक्यानं केला जातो. त्यामुळे त्याची कोणतीही खूण मागं ठेवली जात नाही. हे घडतंय आणि आम्ही, आमचा समाज, आमचं राष्ट्र चक्क ढाराढूर झोपलो आहोत. मी हे पुस्तक लिहून पूर्ण केलं, त्याच्या अगोदरच, भारताच्या काही भागांमध्ये स्त्रियांच्या जवळजवळ दोन पिढय़ा उखडून टाकण्यात आलेल्या होत्या आणि अजूनही यावर कुठलाही ठोस उपाय दृष्टिपथात नाही’ (पान आठ)
स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो, ही बाब समाजाच्या असांस्कृतिक, असंमज, संवेदनशून्य वृत्तीची  निदर्शक नाही का?
‘नाहीशा होणाऱ्या मुलींच्या शोधात’ या पहिल्या प्रकरणात तामिळनाडूमधल्या काही जिल्ह्य़ांमधील मुलींच्या खुनांचं भयंकर वास्तव कथन केलं आहे. उसिलमपट्टी गावातील स्त्रियांनी स्वत:च्या मुलीला ठार मारण्याच्या घटना व त्यामागील सामाजिक पर्यावरण अंगावर काटा आणणारं आहे. या प्रकरणात लेखिकेनं एके ठिकाणी आकडेवारी दिली आहे. ‘राजस्थानातलं जयपूर राजधानीचं शहर. या ठिकाणी केला गेलेला एक शोधअभ्यास असं सांगतो की, प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा चाचणी केल्यामुळे दरवर्षी जयपूरमध्ये सुमारे तीन हजार पाचशे मुली जन्म घेण्यापूर्वीच मारल्या जातात. ‘युनिसेफ’नं १९८४ मध्ये मुंबईमध्ये गर्भलिंग चिकित्सा केल्यानंतर केल्या जाणाऱ्या गर्भपातांचा आढावा घेऊन छाननी केली. त्यात असं आढळलं की, पाडण्यात आलेल्या आठ हजार गर्भापैकी सात हजार नऊशे नव्व्याण्णव गर्भ मुलींचे होते.’ (पृष्ठ०३) या आकेडवारीचा आणि संपूर्ण देशाचा विचार केला असता स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण किती जास्त आहे आणि त्याकडे समाजाचं अजिबात लक्ष नाही, ही गंभीर बाब स्पष्ट होते. पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावाखाली वावरत असलेल्या समाजमनाला स्त्रीभ्रूण हत्या हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा वाटत नाही, हा प्रकार हिंसाचाराच्या संस्कृतीचे सार्वत्रिकरण झालं असल्याचा पुरावा नव्हे काय? या पुस्तकाच्या पानापानावर स्त्रीभ्रूण हत्या आणि बालिकांच्या खुनांची आकडेवारी दिलेली आहे. भारतातल्या विविध भागातील ही आकेडवारी संपूर्ण देशातच स्त्रीभ्रूण हत्येला मूकसंमती असल्याचा प्रकार अधोरेखित करणारा आहे.
एका ठिकाणी फावलम या लिंगसापेक्ष गर्भपात विरोधी मोहीम चालविणाऱ्या महिलेचं मत लेखिकेनं नमूद केलं आहे. ‘तामिळनाडूमध्ये होणाऱ्या बालिकांच्या हत्या’ या विषयावरच्या एका लेखात फावलम् लिहिते.’ तान्ह्य़ा मुलीला मारून टाकण्याच्या प्रसंगात स्त्रियांची जी गुंतागुंतीची भूमिका असते त्याचं एसआयआरडीनं नीट पृथक्करण करून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की, स्त्रिया स्वत:वर हिंसाचाराचे आरोप ओढवून घेतात, कारण त्यांच्या मनावर लहानपणापासून असं बिंबवण्यात आलेलं आहे की, त्यांची स्वत:ची किंमत पतीच्या लायकीनुसार समाजात ठरत असते. नवऱ्याच्या मर्जीविरुद्ध वागलं किंवा त्याला सुख दिलं नाही तर कित्येक जणींना समाजातून बहिष्कृतही व्हावं लागतं, त्यामुळे ‘मीच कमी पडते’, ‘मलाच मेलीला कळलं नाही’ किंवा ‘माझ्या अंगात धमक नाही’ असा सतत समाजाला दोष देण्यासाठी समाजाकडूनही एक प्रकारे त्यांना उत्तेजनच मिळत असतं. ही सामाजिक प्रक्रिया एका अशा संस्कृतीतून निर्माण होते जिथं स्त्रीच्या अंगातल्या जननक्षमतेला नेहमी कमी लेखलं जातं. तिच्या स्त्रीत्वाचा वस्तूसारखा व्यापार मांडला जातो. ती करत असलेलं काम, तिचं चारित्र्य यांची नेहमी उपेक्षा, हेटाळणी केली जाते.’ फावलमला वाटतं की, या सगळ्याचा परिणाम ‘मुलगा श्रेष्ठ. तोच झालेला चांगला’ हा पूर्वग्रह तिचं अंतरंग व्यापून टाकतो आणि मग स्वत:च जन्माला घातलेल्या मुलीला गुपचूप मारून टाकायला ती प्रवृत्त होते. त्याकरिता तिचं मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात घालायलाही बिचारी तयार होते. हा एक प्रकारे आत्महत्येचाच प्रकार आहे’ (पृष्ठ ३३) हे विश्लेषण स्त्रीभ्रूण हत्येच्या आणि बालिकांच्या खुनांची अलक्षित बाजू मांडणारं आहे.
या पुस्तकातील दहाही प्रकरणांमधून स्त्रीभ्रूण हत्या व बालिकांच्या खुनांचं वास्तव कथन करीत या प्रकारांचे सर्व पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील स्त्रीभ्रूण हत्यांच्या शोकांतिका सांगत लेखिकेनं या जटिल समस्येच्या निवारणार्थ काय काय प्रयत्न केले जाऊ शकतात, त्याचीही गंभीरपणे चिकित्सा केली आहे. स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना हे पुस्तक यासंदर्भातील माहिती, या समस्येचं आकलन होण्यास मदत व कार्य करण्याची उमेद देणारं आहे. स्त्रीभ्रूण हत्येची समस्या समजून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं.        
डिसअ‍ॅपिअरिंग डॉट्र्स:- गीता अरवामुदन, अनुवाद- सुनंदा अमरापूरकर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा