मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड तालुक्यात मुजोर प्रशासन आणि पोलिसांमुळे मटका, गुटखा, गावठी दारू, देशी-विदेशी दारूची ग्रामीण भागासह ठिकठिकाणच्या गल्ली बोळातील विक्री, लॉटरी व्यवसायाच्या पडद्याआड सुरू असलेले नानाविध धंदे, बोकाळलेली सावकारी अशा वातावरणामुळे सर्वत्र गुन्हेगारीचा उच्छाद झाल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर वरिष्ठांकडून दखल घेतली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान आज सातारा अन्न व औषध प्रशासनाने अचानक केलेल्या कारवाईत तब्बल १ लाख ६० हजार ३८० रुपयांचा गुटखा एका चारचाकी गाडीतून जप्त केल्याने खळबळ माजली आहे.
या बाबतची संबंधितांकडून तसेच, घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहगाव (ता. कराड) येथील सेवा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत टाटा इंडिगो मान्झा (क्रमांक एमएच ०९, बी. यू. ३३३) या चारचाकी गाडीतून १ लाख ६० हजार ३८० रुपयांचा, २७ गोण्यांमध्ये असलेला राज कोल्हापुरी गुटखा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आला. गोरख पांडुरंग वीर (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले) हा आपल्या वाहनातून हा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना, कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी रामलिंग बोडके, योगेश ढाणे, तळबीडचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम व सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. २० जुलै २०१३ पासून गुटख्यावर बंदी असताना कराड तालुक्यात मात्र, गुटख्याची ठिकठिकाणी विक्री होत असल्याचे चित्र आहे. याबाबत कसून तपास केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, बेकायदा व्यवसायातून स्वहित जोपासले जात असल्याने कारवाई होत नसून, अधूनमधून कारवाईचा केवळ फार्स होत असल्याची नाराजी जनतेतून व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा