हिंगोली पीपल्स सहकारी बँकेच्या जालना शाखेतील १० कोटी ५६ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. राजेश ऊर्फ गोलू सुगणचंद रुणवाल, तसेच सुनील सुरेश सुरा अशी त्यांची नावे असून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
सुनील सुरा हा राजेश ऊर्फ गोलू याचा नोकर असून गैरव्यवहारातील रक्कम ‘कमोडिटी मार्केट’मध्ये या दोघांना देण्यात आल्याचा आरोप आहे. हे दोघे सापडत नसल्याने न्यायालयाने त्यांना फरारी घोषित करून त्यांच्याविरुद्ध पकड वॉरन्ट जारी केले होते. या गुन्ह्य़ातील आरोपी हिंगोली बँकेच्या जालना शाखेचा व्यवस्थापक गोपाल अग्रवाल, तसेच निलंबित कर्मचारी प्रकाश गायकवाड व दिनेश गडेचा यांना पूर्वीच अटक झाली. आणखी एक आरोपी अशोक फुलचंद अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.
बँकेच्या एकूण २६ शाखा असून मुख्य कार्यालय हिंगोली येथे आहे. एखाद्या कर्ज प्रकरणाची अंतिम मंजुरी देण्याचे काम मुख्य कार्यालयात होते. परंतु अशा प्रकारे रितसर कर्ज मंजूर नसतानाही १४ बनावट खाती उघडून १० कोटी ५६ लाख ८ हजार ४३० रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
बँकेचा शाखा व्यवस्थापक अग्रवाल गायब असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने गेल्या ३ मे रोजी पोलिसांत दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बँकेत कुरिअरने आलेल्या पत्रात अग्रवाल याने गैरव्यवहार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर झालेल्या लेखापरीक्षणात हा गैरव्यवहार समोर आला. बनावट मुदत ठेव पावत्या, त्याआधारे बनावट सह्य़ा व कागदपत्रे तयार करून मंजूर नसलेले कर्ज उचलण्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले.
गुन्ह्य़ातील आरोपी आशिष रंगलाल साबू यास अटक केल्यानंतर त्याने अशोक अग्रवाल याच्या २०१२-१३ची आर्थिक व्यवहाराची पेन ड्राईव्हमध्ये संकलित केलेली माहिती पोलिसांसमोर सादर केली. या प्रकरणात जी १४ बनावट खाती उघडण्यात आली, त्यातील रकमा वळत्या करण्यास आणखी एक बनावट खाते उघडण्यात आले. पैकी कोणत्याही खात्यावर कर्ज मंजूर नसताना ते मंजूर दाखवून स्वत:चे धनादेश पास करून पैसे काढल्याचा आरोप शाखा व्यवस्थापक अग्रवाल याच्यावर आहे. या प्रकरणातील आरोपी अशोक फुलचंद अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा