भरदिवसा महापालिकेतील सत्ताधारी गटाचे युवा नगरसेवक विनायक सोनवणे यांची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली असली तरी आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्राणघातक हल्ले होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या हल्ल्यामुळे शहरातील राजकारण कोणत्या थराला जात आहे, त्याचे दर्शन सर्वाना घडले आहे.
प्रभाग ४४चे सत्ताधारी शहर विकास आघाडीचे नगरसेवक व प्रभाग अधिकारी विनायक सोनवणे यांच्यासारख्या चांगल्या माणसाची हत्या का म्हणून करण्यात आली, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. २००८च्या महापालिका निवडणुकीत सोनवणे सर्वप्रथम निवडून आले. त्यांनी त्या वेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान पालकमंत्री गुलाब देवकर यांचा पराभव केला होता. गंमत म्हणजे हा पराभव झाल्यावर वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवकर आमदार म्हणून निवडून आले. मंत्री आणि पालकमंत्रीही झाले. महापलिका निवडणुकीत ‘देवकरांना पाडणारा उमेदवार’ म्हणून सोनवणे विशेष चर्चेत आले होते. राजहंस सूर्यवंशी तथा नाना दाढी आणि सोनवणे यांच्यात पूर्वी बऱ्यापैकी संबंध होते. सोनवणे हे नगरसेवक झाल्यानंतर त्यात दुरावा निर्माण झाला. सोनवणे यांच्यासोबत राहणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना नानाच्या मुलांनी दोन वेळा मारहाण केली. त्याचा राग आल्याने सोनवणेंच्या कार्यकर्त्यांनीही नानाच्या मुलांना मारहाण केली. त्यात नानाच्या एका मुलाच्या डोळ्यास दुखापत झाली. त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या नाना दाढी व त्याच्या मुलाने सोनवणे यांच्यावर हल्ला केल्याचे म्हटले जाते.
सोनवणे यांच्यावरील हल्ल्यानंतर बाप-बेटे सरळ पोलीस ठाण्यात उपस्थित झाले. सोनवणे यांच्या हत्येमुळे सूडचक्र यापुढेही सुरू राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगाव शहरातील राजकारणाचा २० वर्षांचा इतिहास पाहता विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंडोरे यांचा मुलगा बापू ढंडोरे, प्रदीप धोत्रे, नगरसेवक शालिक सोनवणे, मेहरूणचे रमेश सोनवणे, सुनील पाटील, पप्पू पाटील आदींची गटा-तटाच्या वैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. वर्षभरात माजी महापौर, नगरसेवक अशोक सपकाळे यांच्या गटाने नवनाथ दारकुंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तर माजी नगरसेवक अरुण शिरसाळे व मुकेश तथा आबा बाविस्कर यांच्यातही वाद उफाळून आला. या झगडय़ात पिस्तुलाचाही वापर झाला होता. शनिपेठ परिसरात प्रशांत सोनवणे यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी नरेंद्र सपकाळे या संशयितास अटक करण्यात आली असली तरी मयत प्रशांत सोनवणे यांच्या कुटुंबीयांचा शहर विकास आघाडीचे मुख्य प्रवर्तक नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यावरच रोष आहे.
नगरसेवक कैलास सोनवणे विरुद्ध प्रशांतच्या परिवाराचा राग गेल्या आठवडय़ात न्यायालय परिसरात दिसून आला. कैलास सोनवणे घरकुल गैरव्यवहार प्रकरणी सहा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. तर त्यांचे दोन भाऊ प्रल्हाद व विलास यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा