सायन पुलाखाली सापडलेल्या दीड महिन्यांच्या मुलीच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ४ च्या पथकाला यश आले आहे. या मुलीच्या आईच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सायन सर्कलजवळील पदपथावर राहणाऱ्या चांदनी शेख (२०) या महिलेची दीड महिन्यांची मुलगी आफ्रिनचे १४ डिसेंबर रोजी अज्ञात इसमाने अपहरण केले होते. तिचा शोध सुरू असताना १८ डिसेंबर रोजी सायन येथील मानव सेवा संघ सभागृहासमोरील पुलाखालील कचऱ्यात आफ्रिनचा मृतदेह आढळून आला होता. तो कुजलेल्या अवस्थेत होता. सायन पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखा ४ चे पथक या हत्येचा समांतर तपास करत होते. पोलिसांकडे कसलाच दुवा नव्हता. आफ्रिनची आई चांदनी आणि वडील अब्दुल हे दोघे मजुरी करतात. त्यांचे कुणाशी वैर नव्हते. अब्दुलला अमली पदार्थाचे व्यसन होते आणि तो चांदनीला मारहाण करत असायचा. दरम्यान, गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्या पथकाने या परिसरातील सर्व सीसीटीव्ही शोधण्यास सुरुवात केली होती. एका ठिकाणी मध्यरात्रीच्या अंधारात एक इसम आफ्रिनला घेऊन जात असलेला दिसला. त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला. सीसीटीव्ही चित्रणात दिसणारा इसम कॅटरिंगमध्ये काम करतो एवढी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनील जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम, अभिजित शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किशोर लांडगे, अरुण जाधव यांच्यासह गोसावी, नार्वेकर, कांबळे, जाधव आणि मांढरे यांच्या पथकाने सायन, माटुंगा आणि दादर परिसरातील सर्व कॅटरिंगच्या दुकानात शोध घेतला. त्यावेळी आरोपी मोहम्मद अझगर मोहम्मद उल रेहमान याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीनंतर गुन्ह्य़ाची कबुली दिली. तो सायन रुग्णालयासमोर राहात होता.
हत्येच्या कारणाबद्दल माहिती देतान गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांनी सांगितले की, आरोपी हा ज्या कॅटरिंगमध्ये काम करायचा तेथील पदपथावर चांदनी पतीसह रहात होती. तिचा पती अब्दुल तिला मारहाण करत असायचा. दरम्यान, चांदनी आणि आरोपी मोहम्मदचे प्रेमसंबंध जुळले. काही दिवस त्यांचे अनैतिक संबंध सुरू होते. दरम्यान, चांदनी पतीपासून गर्भवती राहिल्याने ती मोहम्मदला टाळू लागली. पण तरी तो तिच्या मागे लागला होता. त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिने आपल्या राहण्याची जागा बदलली. या काळात तिने आफ्रिनला जन्म दिला आणि मोहम्मद बरोबरचे सर्व संबंध तोडले. या आफ्रिनमुळेच आपले संबंध तुटले अशा भावनेने मोहम्मद पछाडला होता. त्यामुळे आफ्रिनचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. १४ डिसेंबरला त्याने आफ्रिन झोपेत असताना तिला घराजवळून उचलून नेले आणि सायन पुलाखाली फेकून दिले. डोक्याला मार बसल्याने तिचा मृत्यू झाला होता.
पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण १) चे धनंजय कुलकर्णी साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ४ च्या पथकाने या हत्येचे गूढ उकलून मारेकऱ्याला अटक केली.

Story img Loader