बंगळुरू येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) एका पथकाने नांदेडमधील तीन तरुणांची चौकशी केली. या तिघांचा जबाब नोंदवून त्यांना सोडून देण्यात आले. सोमवारी रात्री झालेल्या या प्रकाराने काही काळ इतवारा परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मराठवाडय़ात बीडपाठोपाठ दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या युवकांसाठी नांदेड कुप्रसिद्ध झाले आहे. पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातही नांदेडच्या काही तरुणांचा सहभाग आढळल्याने एनआयए, एटीएस (दहशतवादीविरोधी पथक) व स्थानिक पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. बंगळुरू येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका बॉम्बस्फोट प्रकरणात तेथील एटीएसने काहींना ताब्यात घेतले. त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातल्या देगलूर नाका परिसरात राहणाऱ्या शेख आबेद, रहमान फारुकी व शाखेर शेख या तिघांची चौकशी केली.एनआयएच्या पथकाने या तिघांना चौकशीसाठी इतवारा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे मोठा जमाव जमला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिष्टाई केल्यानंतर या तिघांचा जबाब नोंदविण्यात आला व नंतर त्यांना सोडण्यात आले. या तिघांची नेमकी काय चौकशी झाली? बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांचा नेमका काय संबंध, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
* पोलिसांचा हवेमध्ये गोळीबार
नांदेड/वार्ताहर
प्रतिमेच्या विटंबनेमुळे मुदखेड शहरात मंगळवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दगडफेक, वाहनांची नासधूस करीत समाजकंटकांनी काही वेळातच लाखो रुपयांचे नुकसान केले. ही घटना सकाळी साडेनऊ वाजता घडली. प्रसंगावधान राखून स्थानिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याने हवेत गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला. वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. मुदखेड शहरातील नगरपालिकेच्या मोकळय़ा जागेत एका बॅनरवर काळा रंग लावल्याने जमाव प्रक्षोभक बनला. संतप्त जमावाने जुना मोंढा, रेल्वेस्थानक परिसर, तहसील कार्यालयावर दगडफेक केली. पोलिसांसमोर सहा वाहनांचे नुकसान केले. प्रसंगावधान राखून पोलीस जमादार बळी राठोड यांनी हवेत गोळीबार केल्याने जमाव पांगला. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई, पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव, प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस उपअधीक्षक अमोल झेंडे यांनी मुदखेड शहराला भेट दिली. राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत.
* पैशांसाठी पत्नीवर चाकूने वार
लातूर/वार्ताहर
३० हजार रुपयांची मागणी करूनही पत्नी पैसे देत नसल्याबद्दल पतीने तिच्यावर चाकूने वार केले व स्वत: फरार झाला. वार झालेली महिला ही गातेगाव पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून नोकरीला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड रोडवरील पोलीस क्वॉर्टरमध्ये वनिता दशरथ सवणे (वय २९) ही पतीसह राहते. पती विनोद इरप्पा साठे हा गेल्या तीन दिवसांपासून प्लॉटसाठी ३० हजार रुपयांची मागणी करत होता. पत्नी पैसे देत नसल्याचा राग मनात धरून रात्री साडेदहाच्या सुमारास गळ्यावर, हातावर व डाव्या खुब्यावर त्याने वार केले. यासंबंधी वनिताने गांधी चौक पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली. तपास पोलीस निरीक्षक एस. डी. ओहोळ करत आहेत.
* जमिनीच्या वादातून एकाचा खून
हिंगोली/वार्ताहर
कुळाच्या जमिनीवरून दिलीप मोतीराम भुक्तर यास सोमवारी सायंकाळी आठ जणांनी गंभीर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताची पत्नी वच्छलाबाई भुक्तर यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. या आठ पैकी रघुनाथ जाधव यास पोलिसांनी अटक केली. हिंगोली शहरापासून काही अंतरावर कोथळज शिवारातील जमिनीचा अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. कुळाच्या जमिनीवरून बाळू देवकर, संतोष देवकर, बाबाराव जाधव, विश्वास बांगर, शामराव वाघमोडे, रघुनाथ जाधव, सीताराम देवकर, सयाबाई देवकर यांनी सोमवारी दिलीप भुक्तर (वय ५०) यास कु ऱ्हाडीने, दगडाने बेदम मारहाण केली.
* पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास अटक
परभणी/वार्ताहर
मानवत तालुक्यातील करंजी सज्जाचे ग्रामसेवक अर्जुन पांडुरंग डिघोळे यांना घरकुलाच्या अनुदानाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना परभणीतील एका हॉटेलमध्ये मंगळवारी पकडण्यात आले. जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील कपिल नागनाथ जाधव यांचे वडील नागनाथ जाधव यांच्या नावाने २०११ मध्ये पंचायत समिती मानवतकडून घरकुल मंजूर झाले होते. घरकुल बांधकामासाठी शासनाच्या वतीने ६८ हजार ५०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. कपिल जाधव यांनी घरकुलाचे बांधकाम केले व अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी ग्रामसेवक डिघोळे यांच्याकडे अर्ज केला. डिघोळे यांनी अनुदानाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी पाच हजार रुपये मागितली. तक्रारीवरून आज सकाळी बस स्टँडजवळील रोज हॉटेलवर सापळा रचला. त्या वेळी पंचासमक्ष पाच हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक डिघोळे यांना पकडले. कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक दिवे यांनी केली.