क्राईम

दाराचा कुलूप-कोंडा तोडून चोरटय़ांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. दक्षिण नागपुरातील द्वारकापुरीमध्ये मंगळवारी रात्री ही चोरी झाली. दिलीपकुमार देवीदास सिडाम हे त्यांच्या पत्नीसह घराला रात्री साडेआठ वाजता घराला कुलूप लावून शाहूनगरात नवीन घराच्या वास्तुपूजनाची पत्रिका देण्यासाठी दिघोरी येथे नातेवाईंकाकडे गेले होते. तेथून रात्री पावणेदहा वाजता परत आले. घराच्या दाराचा कुलूप-कोंडा त्यांना तुटलेला दिसला. घरातील आलमारीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने (किंमत सव्वा लाख रुपये) चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
वाटमारी
मोटारसायकलवर आलेल्या दोन लुटारूंनी एका सेल्समनला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील एबीसी टॉवरजवळ घडली. चंद्रकांत नागोराव वाघ (रा. तांडापेठ) हे विक्रीनंतर गोळा झालेले ४३ हजार ८२ रुपये घेऊन मालवाहूऑटो रिक्षाने जात होते. मोटारसायकलवर आलेल्या दोन लुटारूंनी त्यांना थांबविले. चाकूचा धाक दाखवून ही रक्कम व एक मोबाईल लुटून पळून गेले. लकडगंज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग

भाजी घेण्यास जात असलेल्या एका सोळा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून विनयभंग करीत धमकी दिल्याची घटना महालमधील गजबजलेल्या झेंडा चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. ही सोळा वर्षांची मुलगी भाजी घेण्यास घराबाहेर पडली. झेंडा चौकात तिच्यासमोर एक कार येऊन थांबली. एक वीस वर्षांचा तरुण कारमधून उतरला. त्याने जबरदस्तीने त्या मुलीचा हात धरून कारमध्ये बसविले. तिला वाकी येथे घेऊन गेला. ‘तू माझ्या सोबत लग्न कर’ असे म्हणत पाहून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार तिने सायंकाळी कुटुंबीयांसह कोतवाली पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी याप्रकरणी किल्ला परिसरात राहणाऱ्या आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. विनयभंगाची दुसरी घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. एक चाळीस वर्षांची महिला घरात असताना आरोपी प्रकाश रामोजी बागडे (रा. रामबाग) घरी आला. मारहाण व अश्लील शिवीगाळ करीत लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार त्या महिलेने इमामवाडा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपीस अटक केली.

Story img Loader