दोन लहान मुलींसह पत्नीला कारमधून दरीत ढकलून देऊन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपी प्रवीण मनवर याच्या घराची मुलताई पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईक आणि मित्रांचीही चौकशी करण्यात येत आहे. आरोपीच्या कबुलीजबाबावर पोलीस अजूनही विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. एचआयव्ही संक्रमण झाल्यानंतर मानसिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोपी प्रवीणने सांगितलेला घटनाक्रम आणि परिस्थितीजन्य पुरावे यातील विसंगतीने पोलीस तपासाला अजूनही दिशा मिळालेली नाही.
गेल्या ३ मार्चला वरूड-प्रभातपट्टन मार्गावर सदाप्रसन्न घाटातील पाचशे फूट खोल दरीत कार ढकलून दिल्यानंतर कारला आग लावून पत्नी आणि दोन लहान मुलींची हत्या केल्याचा आरोप प्रवीण मनवर या अभियंत्यावर आहे. प्रवीण हा मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एनटीपीसीच्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या स्थापत्य विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. आयआयटी झालेल्या प्रवीणने हे कृत्य केले असावे, यावर त्याचे कुटूंबिय आणि मित्र विश्वास ठेवण्यास तयार नसले, तरी पोलिसांनी त्याला हत्येचा आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे केले आहे. बुधवारी बैतूल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश जैन यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
आरोपी प्रवीणलादेखील त्यावेळी पोलीस सोबत घेऊन गेले होते. दुसरीकडे, मुलताई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जे. पी. यादव यांच्या नेतृत्वातील पथकाने अमरावतीत पोहोचून चौकशी आरंभली आहे. पोलीस पथकाने प्रवीणच्या येथील शंकरनगर परिसरातील फलॅटची झडती घेतली आणि घराला सील केले. पोलिसांनी अमरावतीत वास्तव्याला असलेल्या प्रवीणच्या तीन मित्रांचे बयाणही नोंदवून घेतले.
प्रवीणच्या विवाहबाह्य संबंधातून त्याला एचआयव्हीची लागण झाली. त्यानंतर पत्नी शिल्पा आणि दोन वर्षीय मुलगी परिणिती हिला देखील एचआयव्ही संक्रमण झाले असावे, असा संशय त्याला होता. त्याने ही बाब शिल्पाला सांगितल्यावर घरातील वातावरणच बिघडून गेले. नऊ वर्षीय मुलगी शर्वरी हिला संक्रमण झालेले नसताना, तिची हत्या प्रवीणने का केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कार दरीत कोसळताना प्रवीण हा कारमध्येच होता, असे प्रवीणने पोलिसांना सांगितले, पण खोल दरीत कोसळूनही प्रवीणला दुखापत का झाली नाही, हे कोडे पोलिसांना आहे. पत्नी आणि लहान मुलींची आधीच हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी कार दरीत ढकलून आग तर लावली गेली नाही ना, या प्रश्नाभोवती पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहेत. पोलिसांनी त्यासाठीच प्रवीणच्या फलॅटची झडती घेतली. ३ मार्चला ही घटना घडल्यानंतर आरोपी प्रवीण हा इटारसी, नागपूर, मुंबई असा प्रवास करून ९ तारखेला अमरावतीत पोहोचला आणि राजापेठ पोलिसांना शरण आला. सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय पत्नी आणि आपण घेतला होता, पण ते ऐनवेळी शक्य होऊ शकले नाही. कारने अचानक पेट घेतला आणि तिघेही जळाले. आपण घटनास्थळाजवळच शर्टचा गळफास करून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तोही अयशस्वी ठरला, असे प्रवीणने पोलिसांना सांगितले आहे. हृदयाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेत आता पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून फॉरेन्सिक तपासणीतूनही बऱ्याच बाबी उघड होणार आहेत.
तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या घराची झडतीमनवर याच्या नातेवाईक आणि मित्रांचीही चौकशी
दोन लहान मुलींसह पत्नीला कारमधून दरीत ढकलून देऊन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपी प्रवीण मनवर याच्या घराची मुलताई पोलिसांनी झडती
First published on: 13-03-2015 at 07:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news from amravati