कंपनीचा बनावट धनादेश देऊन फसवणुकीचा प्रयत्न केल्याने वकिलाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. ज्ञानेश्वर बाबुराव चंद्रवंशी असे त्याचे नाव असून, तो कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव येथील रहिवासी आहे. यापूर्वीही त्याने शेतकऱ्याला कर्ज मिळवून देतो, असे सांगून फसविले होते.
येहळेगाव (तुकाराम) येथील अॅड. ज्ञानेश्वर बाबुराव चंद्रवंशी यांनी ६ सप्टेंबर २०१३ रोजी डोंगरकडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ६६ सुपरपॉवर इन्व्हेस्टमेंट सवर्ि्हसेस लिमिटेड कंपनीचा धनादेश  स्वत:च्या खात्यावर (क्र. ३२३८७२१८४५) १ सप्टेंबर रोजी जमा करण्यास दिला होता. परंतु पंचवटी नाशिक येथील बँकेने असा कोणताही धनादेश दिला गेला नसल्याचे सांगितल्याने या बनावट धनादेशाचे बिंग फुटले.
बँक शाखा व्यवस्थापक अरुणकुमार मालखेडे यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसात आरोपी ज्ञानेश्वर बाबुराव चंद्रवंशी यांच्याविरुद्ध बनावट धनादेश देऊन बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख करीत आहेत.