जिंतूर नगरपरिषदेच्या परभणी येथील अॅक्सीस बँकेतून धनादेशावर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट शिक्के मारून व सही करून २३ लाख रुपये काढल्याचा प्रकार दोन महिन्यांनंतर उघडकीस आला. धनादेश ‘कॅश’ करणाऱ्या जाफरखान मुजफर खान या भामटय़ावर जिंतूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी न. प. कार्यालयातून अॅक्सीस बँकेच्या धनादेश पुस्तकातून ७३१० व ७३१३ या क्रमांकाचे दोन धनादेश चोरीला गेले असून, यातील ७३१० क्रमांकाच्या धनादेशावर ७ ऑगस्टला जाफरखान मुजफरखान या नावाने २३ लाख रुपयांची बँकेतून उचल केल्याचे दोन महिने उलटल्यानंतर जिंतूर नगरपालिकेच्या लक्षात आले. या व्यवहारात बँकेच्या अधिकाऱ्याचाही हात असावा, असा संशय व्यक्त केला आहे. २३ लाख रुपयांचा धनादेश बेअरर कसा वठविला हे गूढ अजून कायम आहे.
पालिकेचे लेखापाल संजय बांडे व अंतर्गत लेखापरीक्षक किशोर देशपांडे यांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांचीही चौकशी करीत आहेत.
जिंतूर नगरपालिकेस नागरी दलितेतर योजनेंतर्गत प्राप्त झालेली रक्कम परभणीच्या अॅक्सीस बँक शाखेत ठेवली आहे. याच शाखेतून ऑगस्टमध्ये बनावट धनादेशावर बँकेने २३ लाख रुपये अदा केल्याचा प्रकार १७ ऑक्टोबरला उघडकीस आला. दोन हजारांपेक्षा जास्त रकमेचे धनादेश अकाऊंट पे करून पालिका देते. मग २३ लाख रुपये एवढी मोठी रक्कम वरील बँकेने बेअररवर कशी काय अदा केली, या बाबत संशय व्यक्त केला जात आहे. या धनादेशावर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या बनावट सह्य़ा व शिक्के असल्याचे स्पष्ट दिसून येत असले, तरी बँकेने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसते.
या प्रकरणी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिलेल्या तक्रारीवरन जिंतूर पोलिसात आरोपी जाफरखानविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. जाफरखान कोण आहे, हेही गूढ पोलिसांना उकललेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2013 रोजी प्रकाशित
धनादेश ‘कॅश’ करणाऱ्यावर गुन्हा
जिंतूर नगरपरिषदेच्या परभणी येथील अॅक्सीस बँकेतून धनादेशावर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट शिक्के मारून व सही करून २३ लाख रुपये काढल्याचा प्रकार दोन महिन्यांनंतर उघडकीस आला.
First published on: 19-10-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime on cheque cash person