इमारतीचे बांधकाम करताना निकृष्ट साहित्य वापरणे, सदनिकाधारकांना सोसायटी नोंदणी व मानवी अभिहस्तांतरण करून न देणे तसेच या कामांसाठी घेतलेल्या रकमेचा अपहार करणे आदी कारणांचा विचार करून कल्याण न्यायालयाच्या आदेशावरून महात्मा फुले पोलिसांनी कल्याणमधील बारावे येथील ओशोधारा बांधकाम कंपनीचे विकासक, वास्तुविशारद यांच्यासह आठ भागीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिम भागातील बारावे भागात ओशोधारा बिल्डर्सचे गिरिधारी कल्याणदास लुल्ला, वास्तुविशारद अनिल निरगुडे यांनी चार वर्षांपूर्वी ओशोधार गृहसंकुलाचे बांधकाम केले. या इमारतीत १७४  सदनिका तसेच एक क्लब हाऊस आहे. ओशोधारा इमारतीचे बांधकाम योग्य रीतीने पूर्ण करण्यात आल्याचा अहवाल वास्तुविशारद अनिल निरगुडे यांच्यासह सी. एन. दुसेजा, ए. आर. खासनीस यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागाला सादर करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवला.
थोडय़ाच दिवसांत इमारतीच्या एका खांबाला तडा गेला. सोसायटी सदस्यांनी व्ही. एस. टेक अ‍ॅन्ड असोसिएटतर्फे इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करून घेतले. या अहवालात ओशोधारा विकासकाने बांधकामासाठी निकृष्ट साहित्य वापरल्याचे तसेच योग्य नियोजन न करता बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सोसायटी सदस्यांनी हा अहवाल महापालिकेच्या नगररचना विभागात सादर केला. महापालिकेने विकासकाला इमारत दुरुस्तीचे आदेश देऊन काही दुर्घटना घडल्यास त्यास विकासकाला जबाबदार धरण्यात येईल असे कळवले.
महात्मा फुले पोलिसांनी मात्र मागील वर्षी ऑगस्टमध्ये इमारतीत काही दुर्घटना घडल्यास त्यास सोसायटी सदस्य जबाबदार असतील असे कळवून विकासक, वास्तुविशारदांना मोकळे सोडले होते. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, विकासकाने ओशोधारा सोसायटी सदस्यांना सोसायटीची नोंदणी करून दिली नव्हती.
मानवी अभिहस्तांतरण करून दिले नव्हते. या दोन्ही कामांसाठी विकासकाने २ कोटी ६६ लाख ८० हजार रुपये सदस्यांकडून जमा केले होते. विकासक या दोन्ही गोष्टी करून देण्यास टाळाटाळ करीत होता. सोसायटीचे पदाधिकारी श्रीमती गिटारे, जितेंद्र नारायण व इतरांनी विकासकाच्या मनमानी विरुद्ध अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या.
त्यास कोणीही दाद देत नसल्याने सदस्यांनी अ‍ॅड. गणेश घोलप यांच्यातर्फे कल्याण न्यायालयात एक दावा दाखल केला होता. सर्व कागदपत्रं व दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून न्यायाधीश डॉ. त. ना. कादरी यांनी पोलिसांना गिरिधारी लुल्ला, चेतन लुल्ला, राजेश गंगवानी, वास्तुविशारद अनिल निरगुडे, सी. एन. दुसेजा, ए. आर. खासनीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.