रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने कराडातील युवकाची ६ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा कराड शहर पोलिसात नोंदविण्यात आला आहे. नितीन मगदुम (रा. तुरची-तासगाव), कैलास अवघडे (रा. अवघडेचाळ-ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक झालेल्या युवकाचे वडील मधुकर केशवराव घाटगे (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी फिर्याद दिली आहे. मधुकर घाटगे यांच्या फिर्यादीनुसार, घाटगे यांचा मुलगा शिवराज याची सासरवाडी तासगाव आहे. गतवर्षी जुल महिन्यात नितीन मगदुम या व्यक्तीला घेऊन शिवराजचे सासरे व मेहुणा कराडमध्ये घाटगे यांच्या घरी आले. नितीन मगदुम याची शासकीय अधिकाऱ्यांशी ओळख आहे. तो शिवराजला रेल्वेमध्ये नोकरी लावेल असे त्यांनी मधुकर घाटगे यांना सांगितले. त्यावेळी नोकरी लावण्यासाठी मगदुमने घाटगे यांच्याकडे ६ लाख रुपयांची मागणी केली. घाटगे यांनी २ लाख रुपये त्याला दिले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात मगदुमने घाटगे यांना फोन करून त्यांना ठाण्याला बोलावून घेतले. त्याठिकाणी कैलास अवघडे या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मगदुमने घाटगे यांच्याकडून १ लाख रुपये घेतले. उर्वरित ३ लाख रुपयेही आताच द्यावे लागतील असे मगदुमने घाटगे यांना सांगितले. मात्र, घाटगेंनी पैसे घरामध्ये असल्याचे सांगितले. त्यावर मगदुमने त्याच दिवशी कराडातील दोन व्यक्तींना घाटगे यांच्या घरी पाठवून ३ लाख रुपये घ्यायला लावले. सर्व पैसे मिळाल्यानंतर १६ ऑगस्ट २०१२ रोजी मगदुमने शिवराजला ठाण्याला बोलावून इंडीयन रिक्रुटमेंट बोर्ड मुंबई यांची स्टेशन मास्तरची ऑर्डर दिली. एका महिन्यात तुम्हाला मुंबईमध्ये नोकरीत रूजू करून घेतो असे त्यावेळी शिवराजला सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर मगदुम व कैलास अवघडे यांनी टाळटाळ करण्यास सुरुवात केली. वारंवार संपर्क साधूनही ते घाटगे यांना दाद देत नव्हते. त्यामुळे अखेर मधुकर घाटगे यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली आहे.