कल्पना देऊनही मुलीचा बालविवाह केल्याबद्दल राजूर पोलीस ठाण्यात इगतपुरी येथील नवरदेव, मुला-मुलीचे आई-वडील व दोन्हीकडच्या अन्य २५ ते ३० नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून या आरोपींना अटक करणसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.  
तालुक्यातील कोदनीचे ग्रामसेवक विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला. तालुक्यातील अशा स्वरूपाची ही पहिलीच घटना आहे. राजूर पोलिसांनी सांगितले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पाटील यांनी प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारीला कोदनी येथे ग्रामसभा घेऊन याबाबतची सर्व माहिती दिली होती.
मात्र मार्चमध्ये रामदास यशवंत पवार व लीलाबाई रामदास पवार यांनी आपल्या शाळेत शिकत असलेल्या मुलीचे लग्न आडवन (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील सुरेश नारायण डोळस यांचा मुलगा नितीन याच्याशी जमविले. हे कळताच पाटील यांनी पुन्हा तातडीची सभा बोलावून सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांसमक्ष पंचनामा करुन मुलीच्या आई-वडिलांना समज व नोटीस दिली, त्यांनीही मुलीचे लग्न न करण्याचे मान्य केले. मात्र ग्रामसेवक पाटील सुट्टीवर गेले हे पाहून गेल्या दि. २१ एप्रिलला कोदनी येथे रीतसर मुलीचे लग्न करून दिले. ही मुलगी शाळेत शिकते व साडेसोळा वर्षांची आहे.
त्याची माहिती मिळताच पाटील यांनी आज सायंकाळी सर्व पुराव्यासह फिर्याद दिली. त्यानुसार राजूर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा ९, १० व ११ नुसार गुन्हा नोंदविला असून पती नितीन सुरेश डोळस, सासरा सुरेश नारायण डोळस, मुलीचे वडील रामदास यशवंत पवार व आई लीलाबाई रामदास पवार यांच्यासह दोन्हीकडील २५ ते ३० नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक मुरलीधर कासार, हेड काँन्स्टेबल एल. व्ही़  काकड, शिवाजीराजे फटांगरे पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader