पनवेल तालुक्यात क्रिकेट संस्कृतीमुळे दोन आठवडय़ांपूर्वी आयोजकांनी पैशांच्या वादातून भागीदाराचा खून केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्री प्रकाशझोतातील क्रिकेट सामन्यादरम्यान हवेत गोळीबार झाल्याची घटना कामोठे परिसरात घडली. स्वसंरक्षणाचा परवाना घेतलेल्या पिस्तुलातून हा गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. क्रिकेट संस्कृतीमुळे वाढत्या गुन्ह्य़ांच्या घटनांमुळे पनवेलची वाटचाल बिहारकडे होतेय का, असा प्रश्न  निर्माण झाला आहे.
कामोठे परिसरात पोलिसांची परवानगी न घेता जुई गावातील जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट संघाने दोन लाख रुपयांचे पहिले रोख पारितोषिक जाहीर करून प्रकाशझोतातील सामने बुधवारपासून सुरू केले. तालुक्यातील खेडय़ातील ३२ संघांनी २२ हजार रुपये प्रवेश शुल्क भरून या सामन्यात प्रवेश घेतला. कामोठे ग्रामपंचायत सदस्य सुनील भेंडे यांनी हे सामने आयोजित केले. रविवारी रात्री दीड वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना विंधने गाव विरुद्ध कामोठे गाव असा रंगला. या वेळी षटकार किंवा चौकाराला कामोठेवासीय फटाक्यांची आतषबाजी करत होते. अखेर सामना कामोठे गावाने जिंकला आणि दोन लाख रुपये आणि पारितोषिक पटकावले.
विजयाचा जल्लोष करण्यासाठी बँडबाजाची तयारी होती. बँडच्या तालावर जल्लोष सुरू असतानाच शिवीगाळ करण्यावरून जुई गावातील तरुण आणि कामोठे गावातील तरुण आमने-सामने आले. काहींनी लाठय़ाकाठय़ांचा सहारा घेत हुल्लडबाजी सुरू केली. या वेळी व्यासपीठावर शंभराहून अधिक जमाव उपस्थित होता. रात्रीच्या वेळी बँडचा ताल आणि दारूच्या नशेत असल्याने यापैकी काहींनी जल्लोषाच्या वेळी अंगावरील कपडे काढून बँडचा ताल धरल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तरुणांच्या दोन गटांत मारहाण सुरू झाली. या वेळी अचानक विकास घरत (वय २५) याने आपल्या जवळील ३२ बोअरचे (६.५ एमएम)चे भारतीय बनावटीचे पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. एवढे होऊनही एकही पोलीस या ठिकाणी उपस्थित नव्हते. गोळीबारानंतर संतप्त जमाव कामोठे पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांना ही घटना समजली. नुकतीच खांदेश्वर पोलीस ठाण्यावर वारकऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रात्री कामोठे पोलिसांनी सावध पवित्रा घेतला.
सोमवारची पहाट झाल्यानंतर दोनही गावांच्या पुढाऱ्यांनी सावध पवित्रा घेत कोणाचीही तक्रार नाही, त्यामुळे गुन्हा का दाखल करता असा रेटा पोलिसांसमोर घेतला. विशेष म्हणजे या घटनेबाबत या परिसरात कोणीही चकार शब्द काढायला तयार नसल्याने पोलिसांची कोंडी झाली. अखेर रात्रपाळीतील पोलीस उपनिरीक्षक विक्रम साळुंखे यांनी सोमवारी स्वत: या घटनेची फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक टी. बी. माने यांनी विकास घरतचे पिस्तूल जप्त करत त्याच्यावर शस्त्रपरवाना उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली. विकासला पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या विकासने स्वसंरक्षणासाठी घेतलेले पिस्तूल आता पोलिसांनी जप्त केले आहे. सकाळपासून विकासवर कारवाई होऊ नये आणि कारवाई झाली तरी सौम्य प्रमाणात व्हावी यासाठी गावातील पुढारी खांद्याला खांदा लावून पोलीस ठाणे आणि न्यायालयात काम करताना दिसले. अन्य आरोपींना पोलीस जीपमधून न्यायालयात सोडले जाते, मात्र विकासला न्यायालयात नेण्यासाठी पोलिसांनी खासगी एसी इनोव्हा कारची सोय करण्यात आली होती. कामोठे परिसरात विकाससारख्या २५ जणांकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना आहे.

Story img Loader