ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यात अडवून त्यांना लुबाडणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. साकीनाका येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेस नुकतेच दोन भामटय़ांनी रस्त्यात गाठून त्यांच्याकडील ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडया काढून घेतल्या. तर घरात गॅसचे रीडिंग घेण्यासाठी आलेल्या भामटय़ाने एका ज्येष्ठ नागरिकास फसवून सात हजार रुपये काढून घेतले.
पार्वती बागूल या सफाई कर्मचारी असून एका खासगी रुग्णालयात काम करतात. नुकतेच त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने त्या गेल्या तीन महिन्यांपासून घरीच होत्या. मागील आठवडय़ात त्या काही कामानिमित्त बाहेर जात होत्या, त्या वेळी दोन तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवले.
या भागातील सेठना मुलगा झालाय आणि तो बायकांना साडय़ा वाटतोय, असे त्यांनी सांगितले. तुमच्या हातातील बांगडय़ा पाहून तो तुम्हाला साडय़ा देणार नाही, असे सांगत जबरदस्तीने बागूल यांच्या हातातील बांगडय़ा काढून घेतल्या. हा काय प्रकार आहे ते सुरुवातीला त्यांना समजलेच नाही.
मला साडय़ा नको असे सांगत त्या नकार देत असतानाच या दोन भामटय़ांनी त्यांच्या हातातील तीस ग्रॅमच्या बांगडय़ा काढून घेतल्या आणि पळ काढला. या बांगडय़ांची किंमत ६० हजार रुपये एवढी आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बागूल यांनी साकीनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. साकीनाका पोलीस या दोन भामटय़ांचा तपास करत आहेत.
याच सुमारास अंधेरी येथे राहणाऱ्या एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकास घरात गॅसचे रीिडग घेण्याच्या बहाण्याने आलेल्या भामटय़ाने फसवले. या वेळी हे ज्येष्ठ नागरिक घरी एकटेच होते. तुमच्या गॅसची गळती होत आहे, त्वरित दुरुस्ती करावी लागेल असे सांगत त्याने त्यांच्याकडून ७ हजार रुपये घेऊन पळ काढला.
पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयोवृद्ध नागरिकांना अशाप्रकारे लुबाडणाऱ्या विविध टोळ्या सक्रिय झाल्या असून पोलिसांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
आम्ही पोलीस आहोत, पुढे दरोडा पडला आहे दागिने काढून ठेवा, असे सांगत ते दागिने हातचलाखीने लुबाडणे; दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून दागिने पळवणे; बँकेच्या बाहेर वृद्धांना नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने लुबाडणे अशा त्यांच्या पद्धती आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* ज्येष्ठ नागरिकांनी सोन्याचे दागिने घालून एकटय़ाने बाहेर जाऊ नये
* कुठल्याही अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नये
* घरात एकटे असताना अनोळखी माणसांना घरात घेऊ नये
* रस्त्यात भेटलेल्या साध्या वेषातल्या पोलिसांवर त्वरित विश्वास न ठेवता त्याबाबत आधी खात्री करून घ्यावी
* देवळात जाताना किंवा प्रभात फेरीसाठी जाताना सोनसाखळी घालू नये
* काही अनिष्ट प्रकार किंवा संकट ओढवल्यास मुंबई पोलिसांच्या १०३ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा.