नंदनवन पोलिसांवर गोळीबार करून थेट पोलीस दलाला आव्हान देत फरार झालेला कुख्यात गुन्हेगार राजा गौस अली याला तब्बल ४० दिवसांच्या शोधमोहिमेनंतर उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्य़ाच्या एका खेडय़ात गाठून त्याच्या हातात बेडय़ा ठोकण्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला यश आले आहे. राजा गौसच्या अटकेची मोहीम राबविताना पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती. सोमवारी त्याला अटक केल्यानंतर आज बेडय़ा घालून नागपुरात आणण्यात आले.
उंटखाना परिसरात १७ एप्रिलरोजी एका तरुणीची छेडखानी करताना हटकल्याच्या कारणावरून रोशन समरित या महाविद्यालयीन तरुणावर मोटारसायकलवरून आलेल्यांनी गोळीबार केल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. आरोपींच्या शोधासाठी शहरात पोलिसांनी नाकेबंदी केली. नंदनवन परिसरात मोटारसायकल हिसकावून पळून जात असलेल्या राजा गौस आणि त्याच्या साथीदाराने जगनाडे चौकाजवळ पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. तशाही स्थितीत त्याच्या मोईन अन्सारी नावाच्या साथीदारास पोलिसांनी पकडले होते. त्याला सोडविण्यासाठी राजाने पुन्हा गोळीबार केला. मात्र, ते शक्य न झाल्याने तो पळून गेला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. रात्रभर त्याचा पाठलाग सुरू होता आणि वाटेत अडविणाऱ्या पोलिसांनावर राजा गोळीबार करीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून जाण्यास यशस्वी झाला.
तेव्हापासून नागपूर पोलीस दल राजाच्या मागावर होते. थेट पोलिसांवर गोळीबार करून आव्हान दिल्याने पोलिसांनीही त्याला जेरबंद करण्याचा चंग बांधला. त्याने गोळीबार केलाच तर जशास तसे उत्तर देण्याचीही पोलिसांची तयारी होती. मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा कळायचा. पोलीस तेथे पोहोचेपर्यंत तो पळून गेलेला असायचा. काही दिवसांनंतर मात्र तो महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शोधासाठी पोलीस जीवाचे रान करीत होते. त्याचे मित्र तसेच नातेवाईकांवर पाळत ठेवण्यात आली.
राजा वेगवेगळे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले. तो उत्तर प्रदेशात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. तो प्रतापगड जिल्ह्य़ातील एका खेडय़ाजवळ आल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर तेथील पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जाळे विणले आणि त्याच्या हातात बेडय़ा ठोकल्या.

Story img Loader