रस्त्यांना खेटून उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये वाहनतळांच्या जागांचा वापर अन्य दुस-याच कारणासाठी होत असल्यामुळे त्याविरोधात महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली असता त्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीचेच दोन नगरसेवक सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे पद अपात्र ठरू शकते. यासंदर्भात पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची भूमिका महत्त्वाची असून त्याकडे जाणकारांचे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोहर सपाटे यांचे सुभाष चौकात हॉटेल शिवपार्वती अस्तित्वात आहे. परंतु स्वत:च्या मालकीच्या या हॉटेलमध्ये वाहनतळासाठीच्या जागेचा वापर वाहनतळासाठी न करता त्याठिकाणी प्रवीण बिअरबार नावाचा व्यवसाय सुरू होता. तर बेगम पेठेत काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या पत्नीच्या मालकीच्या इमारतीत वाहनतळाच्या जागेवर त्यांनी हॉटेल सुलताना बिर्याणी हाऊस थाटले होते. परंतु पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अशा इमारतीमधील वाहनतळांच्या जागांच्या बेकायदा वापराविरोधात भूमिका ठरून पाडकाम मोहीम हाती घेतली आहे. यात सपाटे व हत्तुरे यांच्या या दोन्ही बेकायदा बांधकामांवर हातोडा पडला. वास्तविक पाहता कायद्यानुसार कोणाही लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रकारे बेकायदा बांधकामे किंवा अतिक्रमणे करता येत नाहीत. कायद्याचा भंग झाल्यास संबंधित नगरसेवक अपात्र ठरू शकतो.
पालिकेने राबविलेल्या बेकायदा बांधकामविरोधी कारवाईच्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांनी तर पालिकेच्या पथकाला काही वेळ कारवाईपासून रोखून धरले व उपस्थित पालिकेच्या व वृत्तपत्र छायाचित्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ करून धमकावले होते. पालिकेचे सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे हे धावून येताच व पोलिसांची कुमक पाहताच नगरसेवक हत्तुरे हे नरमले व स्वत: अतिक्रमण काढण्यासाठी पुढे आले. अवैध बांधकाम पाडकाम मोहिमेच्या छायाचित्रीकरणासाठी महापालिकेने नियुक्त केलेले छायाचित्रकार श्याम भूदत्त यांच्यासह अन्य प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांना नगरसेवक हत्तुरे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकावल्याच्या घटनेचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष यदू जोशी व सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार व वृत्तपत्र छायाचित्रकारांची बैठक होऊन त्यात नगरसेवक हत्तुरे यांच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर श्रमिक पत्रकार संघ, प्रेस क्लब व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर शाखेच्या पुढाकाराने पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
 बिअरबारला परवाना कसा?
दरम्यान, नगरसेवक सपाटे यांच्या मालकीच्या हॉटेल शिवपार्वतीच्या इमारतीत वाहनतळासाठी राखीव असलेल्या जागेत प्रवीण बिअरबार सुरू असल्याने पालिका पथकाने हे बिअरबार जमीनदोस्त केले. परंतु अशा बेकायदा जागेत शासनाने बिअरबार सुरू करण्याचा परवाना कसा दिला? जागा वापराबाबत नाहरकत प्रमाणपत्र का मागितले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम हे संबंधितांवर काय कारवाई करणार? बेगमपेठेत काँग्रेसचे नगरसेवक हत्तुरे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेतही वाहनतळाच्या ठिकाणी बेकायदेशीपणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास पोलीस आयुक्तालयाकडून कशी परवानगी मिळाली? त्याबद्दल पोलीस आयुक्त प्रदीप रासकर हे कोणती कारवाई करणार, याकडेही जाणकारांचे लक्ष वेधले आहे.

Story img Loader