‘‘पाकिस्तानमधील तुरूंगात कैद्यांच्या हल्ल्यात सरबजितसिंग हा जखमी होऊन मरण पावल्याच्या घटनेनंतर केंद्रातील संपुआ सरकार कणा नसलेले सरकार असल्याचे दिसून येते. या प्रश्नावर जागतिक मानवी हक्क आयोगाकडे सरकारने दाद मागायली हवी होती. परंतु हे सरकार कोणतीही कृती करू शकत नाही. अंध, बहिरे आणि मुके असलेले केंद्रातील दुर्बल सरकार हे देशाचे दुर्दैव आहे,’’ अशा तिखट शब्दात भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्रावर हल्ला चढविला.
सोलापूरजवळ बीबी दारफळ (उत्तर सोलापूर) येथे शेतकरी निर्धार मेळाव्यासाठी गडकरी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, एकीकडे चीन भारताच्या सरहद्दीत घुसत असताना त्यावर बोलायला केंद्र सरकार तयार नाही. तर, पाकमध्ये तुरूंगात कैद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या सरबजितसिंगच्या प्रकरणात ठोस भूमिका घेत नाही. एकूणच सांगायचे तर कणा नसलेले हे सरकार आहे. या सरकारला डोळे आहेत, परंतु पाहू शकत नाही; कान आहेत, परंतु ऐकू शकत नाही आणि तोंड असूनही बोलू शकत नाही. उलट, हे सरकार पाक व चीनपुढे शरणागती पत्करते. असे दुर्दैवी व दुर्बल सरकार देशाला लाभले आहे. दहशतवादाच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेतली जात नाही. देशाच्या सीमेचे रक्षण करू शकत नाही. देशातील अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखू शकत नाही. आया-बहिणींच्या अब्रू दिवसाढवळ्या लुटल्या जात असताना त्यांचेही रक्षण न करणारे हे केंद्र सरकार म्हणजे दुर्बलतेचा नमुना आहे, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडविली.
संपुआ सरकार स्वत:ला वाचविण्यासाठी सीबीआयचा वारंवार दुरूपयोग करते, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. हे सरकार कधी मायावतींसाठी तर कधी जयललिता तर कधी मुलायमसिंह यादव यांच्यासाठी सीबीआयचा प्रयोग करीत आले आहे. वाघ म्हटले तरी खाणारच आणि वाघोबा म्हटले तरी खाणारच, अशी सरकारकडून केल्या जाणाऱ्या सीबीआयच्या दुरूपयोगाबाबतची विरोधकांची स्थिती आहे. तेव्हा विरोधकांनी न घाबरता संपुआच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे, असेही मत त्यांनी मांडले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये आपण भाजपचा प्रचार दौरा केला असून यात भाजप हिंमतीने लढत असून मतदारांकडून भाजपवर विश्वास व्यक्त करण्याची खात्री असल्याचा दावाही गडकरी यांनी केला.
मानवी हक्क आयोगाकडे दाद मागायला हवी होती-नितीन गडकरींची टीका
‘‘पाकिस्तानमधील तुरूंगात कैद्यांच्या हल्ल्यात सरबजितसिंग मरण पावल्याच्या घटनेनंतर जागतिक मानवी हक्क आयोगाकडे सरकारने दाद मागायली हवी होती. अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली.
First published on: 04-05-2013 at 12:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism by nitin gadkari on govt regarding sarabjitsinghs death