इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या मराठीच्या पाठय़पुस्तकांमध्ये मोठय़ा प्रमाणात अमराठी शब्दांचा वापर करण्यात आला असून त्यामुळे मराठी भाषेचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकांमधून विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होत असल्याची टीका मराठी अभ्यास परिषदेने केली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते पाचवीच्या मराठी विषयाच्या पुस्तकामध्ये नात्यांची ओळख करून देण्यासाठी तम्मा, तंगी, बहन, ताऊ, चाचा, अंकल असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना अशाप्रकारे मराठी भाषेचे शिक्षण मिळाल्यास काही वर्षांनी मराठी भाषा ही बोलण्यापुरतीच राहील, असे परिषदेने त्यांच्या पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकात मूल्यांचाही विचार करण्यात आलेला नाही. सहावीच्या मराठीच्या पुस्तकातील गोष्टीतील मुलाच्या तोंडी त्याच्या आजीबद्दल अपमानास्पद शब्द टाकण्यात आले आहेत. तर दुसऱ्या एका गोष्टीमध्ये
अपंग मुलांबद्दल पांगळा, लंगडा असे शब्द
टाकण्यात आले आहेत. या प्रकाराबद्दल राज्यपालांकडे दाद मागण्यात येणार असल्याचेही परिषदेने पत्रात म्हटले आहे.
याबाबत गरवारे महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका सुप्रिया खाडिलकर यांनी सांगितले, ‘‘इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेसाठी दोन आणि इंग्रजी भाषेसाठी पाच तासिका असतात. त्यामुळे पाचवीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठी भाषा कच्ची राहते.’’ परिषदेचे कार्यकर्ते विजय पाध्ये म्हणाले, ‘‘सध्या इंग्रजी माध्यमासाठी असलेली मराठीची पुस्तके ही भाषा शिकण्यासाठी
उपयुक्त नाहीत, त्याचप्रमाणे या पुस्तकांमधून चुकीचे संस्कार होत आहेत.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा