कृषी विभागाचे झोपेचे सोंग
जिल्हाभरातील पाऊस व वातावरणातील बदलांमुळे विविध पिकांवर रोगांनी आक्रमण केले आहे. असे असताना कृषी विभागाने कोणत्या रोगांवर शेतकऱ्यांनी कसा प्रतिबंध करावा, कोणत्या औषधांची फवारणी करावी, याचे पत्रकही प्रसिद्ध न केल्याने झोपेचे सोंग घेतले असल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे.
यावर्षी पावसाने दमदार सुरुवात केली. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याचे काम पडले नाही. पिके जोमदार आहेत. मात्र, सातत्याने सुरू असलेला पाऊस व वातावरणातील बदलांमुळे मका, सोयाबीन, कपाशी व इतर पिकांवर विविध रोगांचा जबरदस्त प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव आहे. मका पिकाची वाढ काही प्रमाणात खुंटली असून पोंग्यात अळी पडल्याने पिके पिवळे पडली आहेत. कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव आहे. असे असतांना शेतकरी कोणत्या रोगावर कोणते कीटकनाशक, पावडर, गोळ्यांचा उपयोग करावा, या चिंतेत आहेत. कृषी विभाग मात्र केबिनमधून जिल्ह्य़ाचा कारभार पाहत आहे. या विभागाचे अधिकारी दौरे करीत नाहीत. रानावनात जाऊन पिकांची पाहणी करीत नाही.
वृत्तपत्रात एखाद्या विभागाची बातमी झळकली की, त्या शिवारात भेट देऊन फोटोसेशन करण्यात कृषी विभाग सध्या व्यस्त आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन त्यांच्याशी चर्चा करून विविध पिकांची पाहणी करावी, तसेच कोणत्या पिकांवर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आहे, याची खातरजमा करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.
आमदार विजयराज शिंदे यांनी तत्परता दाखवून नुकतीच कृषी विभागाची बैठक घेतली. मात्र, त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धिपत्रक काढून कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कायम उपाययोजना करावी, यासाठी पुढाकार घेतला
नाही.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव
कृषी विभागाचे झोपेचे सोंग जिल्हाभरातील पाऊस व वातावरणातील बदलांमुळे विविध पिकांवर रोगांनी आक्रमण केले आहे. असे असताना कृषी विभागाने कोणत्या रोगांवर शेतकऱ्यांनी कसा प्रतिबंध करावा, कोणत्या औषधांची फवारणी करावी, याचे पत्रकही प्रसिद्ध न केल्याने झोपेचे सोंग घेतले असल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे.
First published on: 19-07-2013 at 08:35 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop diseases farmers not getting the right guidance