अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील १ लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रातील पीक व २१५ किलोमीटरचे रस्ते वाहून गेल्याने ५० कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. पंधरा तालुक्यात सरासरी १०८८ मि. मी. पावसाची नोंद घेण्यात आली असून जिल्ह्य़ात सर्वाधिक १३९५ मि. मी. पाऊस चंद्रपूर तालुक्यात नोंदविण्यात आला. जिल्ह्य़ात अतिवृष्टीने ५५० गावे बाधित झाली व चार हजारावर घरांची पडझड झाली आहे.
अतिवृष्टीनंतर या जिल्ह्य़ात पावसाने उघडीप दिली असली तरी नदी काठावरील भागात पूर परिस्थिती कायम आहे. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी जिल्ह्य़ातील प्रचंड नुकसान लक्षात घेता तातडीने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. १४१ टिमच्या माध्यमातून हे काम सुरू असून प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्य़ात तब्बल १ लाख २६ हजार हेक्टरमधील पीक पूर्णत: वाहून गेले आहे. यातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक ८५ हजार ३३७ हेक्टर व ५० टक्क्यांपेक्षा कमी ३९ हजार ८८१ हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले आहे. यातही धानाचे १८ हजार ४३५, सोयाबीन ३६ हजार ७२६, कापूस २४ हजार ४५४ व तूर ५ हजार ३७८, इतर पिके ३३४ हेक्टरमधील वाहून गेले. ३९ हजार ८८१ हेक्टरमधील ७ हजार ८५० हेक्टरमधील धान, १० हजार २९१ हेक्टर कापूस, १९ हजार ४८२ हेक्टरमधील सोयाबीन व १ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रातील तूर वाहून गेले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने हा सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना आज सोपविला, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता लुंगे यांनी २१५ किलोमीटरचे रस्ते वाहून गेल्याचा सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोपविला. त्यानुसार रस्ते दुरुस्तीसाठी ५० कोटीच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
या पावसामुळे जिल्ह्य़ात अंशत ३८४९ व पूर्णत: १९० घरांचे नुकसान झाले आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना जिल्हा प्रशासनाने १५ लाख ५ हजार रुपये मदत वाटप केली आहे. या पावसात ७१ जनावरे मृत्यू पावले असून यासाठी प्रशासनाने २० हजार रुपयाची सानुग्रह अनुदान संबंधितांना वाटप केले आहे. या जिल्ह्य़ातील तालुकानिहाय पावसाची नोंद खालीलप्रमाणे आहे. चंद्रपूर १३९५ मि.मी., बल्लारपूर १०५८, गोंडपिपरी ११२२, पोंभूर्णा १०३१, मूल १००६, सावली ८२७, वरोरा १३०६, भद्रावती १०९८, चिमूर १०९३, ब्रम्हपुरी १२५२, सिंदेवाही ८६८, नागभीड ९३०, राजुरा १०६३, कोरपना ११५६ व जिवती तालुक्यात १११५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ाचे सर्वसाधारण पर्जन्यमान ११४२.१४ मि. मी. असून २५ जुलैपर्यंत जिल्ह्य़ात १०८८.३६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर, वरोरा व कोरपना तालुक्यात पावसाने सरासरी गाठली आहे. पावसामुळे जिल्ह्य़ात ५५६ गावे बाधित झाली आहेत. चंद्रपूर ३९, बल्लारपूर २२, गोंडपिपरी ५२, पोंभूर्णा २५, मूल २७, सावली ०१, वरोरा ५४, भद्रावती ९१, चिमूर ८२, ब्रम्हपुरी ३८, सिंदेवाही १८, नागभीड ३२, राजुरा ४५, कोरपना १८ व जिवती तालुक्यातील ०२ गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. या अतिवृष्टीमुळे चंद्रपूर तालुक्यातील ४४४, बल्लारपूरमधील ९२, पोंभूर्णामध्ये ६०, वरोरामधील ३६५ व मूलमधील ०२, अशा ९६३ कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.
या जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे व वीज पडल्यामुळे एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील ३, बल्लारपूर तालुक्यातील ०२, भद्रावती तालुक्यातील ०२, चिमूर तालुक्यातील ०२ व ब्रम्हपुरी तालुक्यातील ०३ व्यक्तींचा समावेश आहे. या जिल्ह्य़ातील घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अंमलनाला, लभानसराड, पकड्डीगुडम, डोंगरगाव व दिना प्रकल्प १०० टक्के भरले असून आसोलामेंढा धरण ५९ टक्के, तर इरई धरण ७८ टक्के भरले आहे.
मच्छी मार्केट कोसळले
मुसळधार पावसामुळे बंगाली कॅम्प येथे मनपाने कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेले मच्छी मार्केटची इमारत पूर्णत: कोसळली आहे. यावरूनच मनपाच्या बांधकामाचा दर्जा लक्षात येतो. अवघ्या सहा वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. सलग पाऊस झाल्यानंतर सुरुवातीला या मार्केटची भिंत कोसळली. त्यानंतर एकेक दुकान कोसळायला सुरुवात झाली. आता तर संपूर्ण इमारतच कोसळली आहे.