नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात गेल्या आठवडय़ात झालेल्या गारपिटीने ४ हजार १४४ हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला, तर ७९२ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आíथक कंबरडे मोडले आहे.
जिल्ह्य़ात गेल्या ३ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. वेगवेगळे प्रकल्प, भूगर्भातून पाणी उपसा करून शेतकऱ्यांनी रब्बी पिके व फळबागा कशाबशा वाचवल्या. परंतु दोन आठवडय़ांपूर्वी सतत तीन दिवस झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात रब्बीअंतर्गत गहू व ज्वारीचे पीक घेतले जाते. तब्बल ४ हजार १४४ हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक आडवे झाले. अनेक ठिकाणी ज्वारी अक्षरश: काळी पडली. एक हजार ५६९ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले, तर १४१ हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या.
जिल्ह्य़ाच्या अर्धापूर, मुदखेड, लिंबगाव, मालेगाव आदी परिसरात केळी, मोसंबी, संत्रीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. या फळांना गारपिटीचा तडाखा बसला. प्रशासकीय पातळीवर नुकसानीचे सर्वेक्षण केले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मात्र अजून काही पडले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान व सरकारकडून मिळणारी मदत यात मोठी तफावत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यंदाही अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. अत्यल्प पावसाने खरिपाचे उत्पादनही अपेक्षेइतके झाले नाही. परतीचा पाऊस बऱ्यापैकी झाल्याने रब्बी पिकांची चांगली साथ मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण ती फोल ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा