‘बेस्ट’च्या वाहतूक विभागाच्या तोटय़ाबाबत नेहमीच बोलले जात असले, तरीही या वाहतूक विभागामुळेच ‘बेस्ट’ला दरमहा दोन कोटी ३८ लाख एवढे घसघशीत उत्पन्न मिळते. हे उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून नव्हे तर बस थांब्यांवरील जाहिरातींपोटी मिळत आहे. मुंबईतील ३०९५ बस स्टॉप आणि २९७६ बस थांब्यांचे खांब यांच्यावर जाहिराती मिळवण्यासाठी १५ जाहिरात संस्थांना दहा वर्षांच्या काळासाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यांच्याकडून हे उत्पन्न ‘बेस्ट’ला दरमहा मिळते.
मुंबईतील बसथांब्यांची संख्या वाढावी आणि प्रवाशांना भक्कम बस थांब्यांचा लाभ मिळावा, यासाठी ‘बेस्ट’ने मध्यंतरी एक योजना आणली होती. या योजनेद्वारे एखाद्या ठिकाणी थांबा होऊ शकतो, असे दाखवून देणाऱ्या कंपन्यांना त्या थांब्यावरील जाहिरातींचे हक्क दहा वर्षांसाठी देण्यात आले होते. त्यानुसार १५ कंपन्यांनी ३९१ जागा दाखवत तेथे बसथांबे उभे केले. या ३९१ बसथांब्यांवरील जाहिरातींचे उत्पन्न दर तीन महिन्यांनी ‘बेस्ट’च्या तिजोरीत जमा होते. हे उत्पन्न १ कोटी ३१ लाख, ७० हजार रुपये आहे. म्हणजे दरमहा ‘बेस्ट’ला ४३ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मुंबईतील तब्बल २०२४ थांब्यांवर ‘बेस्ट’ने शेड बांधून दिल्या. त्यानंतर या ठिकाणी जाहिरातींसाठीचे हक्क तीन कंपन्यांना देण्यात आले असून या कंपन्यांकडून ‘बेस्ट’ला दरमहा ठरावीक उत्पन्न मिळते. हे हक्क या कंपन्यांना तब्बल १५ वर्षांसाठी देण्यात आले आहेत. या कंपन्यांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम दरमहा एक कोटी ७८ लाख ५५ हजार ८९० रुपये आहे. त्याशिवाय शहरातील रस्त्यांवर असलेले थांब्यांचे खांब पाहून त्या साध्या खांबांच्या जागी आकर्षक सजावट करून काही खांब उभारण्यात आले आहेत. या खांबांवरील जाहिरातींसाठी ‘मेसर्स प्रचार कम्युनिकेशन्स’ या कंपनीला कंत्राट देण्यात आले असून या कंपनीकडून दरमहा ९ लाख ६२ हजार रुपये ‘बेस्ट’ला मिळतात.

Story img Loader