मंदीचे ढग आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय अशा सर्वच स्तरांवर दाटून आले असले तरी महाविद्यालयांच्या परिसरात त्यांचे अस्तित्त्व तसे विरळच असल्याचे यंदाच्या महोत्सवांच्या खर्चाचे आकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.
मल्हार, उमंग या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये खर्चण्यात आलेल्या पैशावरून याची प्रचीती आलीच होती. पण, आता सांस्कृतिक महोत्सवांच्या तुलनेत कमी प्रतिसाद असलेल्या तंत्रज्ञान महोत्सवांमध्येही प्रायोजकांचा हात तसा सैलच राहिल्याचे चित्र आहे. ‘टेकफेस्ट’ या तंत्रज्ञान महोत्सवांचा दादा समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) महोत्सवाचा यंदाचा खर्च तब्बल एक कोटी ६ लाखांच्या आसपास गेला आहे. प्रायोजकत्व चांगले मिळाल्याने टेकफेस्टच्या स्पर्धामध्ये यंदा कधी नव्हे ती लाखालाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे, टेकफेस्टच्या विविध स्पर्धामध्ये यंदा मोठय़ा संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत, असे टेकफेस्टच्या आयोजकांपैकी एक असलेल्या दिव्यम बन्सल या विद्यार्थ्यांने सांगितले.
कुठल्या महोत्सवाला कितीचे प्रायोजकत्व द्यायचे ते त्या महोत्सवाला हजेरी लावणाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असते. टेकफेस्टच्या तीन दिवसांत तब्बल १ लाख विद्यार्थी पवईच्या कॅम्पसवर हजेरी लावतात. टेकफेस्टच्या खालोखाल मुंबईत सर्वाधिक मोठय़ा समजल्या जाणाऱ्या ‘टेक्नोव्हॅन्झा’ या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’च्या तंत्र महोत्सवात साधारणपणे ३० हजाराच्या आसपास हजेरी असते. त्यामुळे, या महोत्सवाचा खर्चही यंदा साठीचा झाला आहे. गेल्या वर्षी या महोत्सवावर आयोजकांनी ५३ लाख खर्च केले होते. यंदा हा आकडा ६०च्या वर गेला आहे, असे टेक्नोव्हॅन्झाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या एका विद्यार्थिनीने सांगितले.
टेकफेस्टला आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा, त्यांनी सुरू केलेल्या कंपन्यांचा, संस्थेचा चांगला हातभार लागतो. व्हीजेटीआय ही राज्य सरकारची अनुदानित संस्था आहे. आयआयटीच्या तुलनेत तशी ‘गरीबच’. त्यामुळे, संस्थेकडून तंत्रज्ञान महोत्सवाला मिळणारी आर्थिक मदत शून्य. तरीही यंदा विविध कंपन्यांकडून ६० लाख रुपयांचे प्रायोजकत्व मिळविण्यात व्हीजेटीआयच्या पोरांना यश आले आहे. टेक्नोव्हॅन्झाची मुख्य प्रायोजक एलआयसी होती. संस्थेला प्रयोजकांकडून कमीत कमी मिळालेली रक्कम १० हजार रुपयांच्या आसपास होती.
केवळ पैशाच्या स्वरूपातच नव्हे वस्तू, टीशर्ट, खाणेपिणे अशा विविध स्वरूपात तंत्र महोत्सवांना कंपन्यांकडून मदत मिळते. व्हीजेटीआयला एल अ‍ॅण्ड टीने प्रदर्शनात लावण्यासाठी स्टॉलही देऊ केले होते. एका कंपनीने तर रंग देऊ केले होते. अशा लहानसहान वस्तू रूपात मदत केल्याचाही बराच फायदा आम्हाला होतो, असे टेक्नोव्हॅन्झाच्या आयोजक विद्यार्थिनीने नेहा दालपे हिने दिली. या शिवाय महोत्सवांची हवा निर्माण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या छोटय़ामोठय़ा कार्यक्रमांसाठी मॉलसारख्या ठिकाणांहूनही प्रायोजकत्त्व मिळते ते वेगळे. अशा कार्यक्रमांसाठी महाविद्यालयांना मदत करणारे तब्बल ६० विविध प्रकारचे प्रायोजक आहेत, असे नेहाने सांगितले.
सुरुवात आठ महिने आधीपासूनच
महोत्सवांसाठी प्रायोजकत्व मिळविणे ही साधीसुधी गोष्ट नसते. प्रत्यक्ष महोत्सवाच्या सात ते आठ महिने आधीपासून विद्यार्थी आयोजनाच्या तयारीला लागतात. म्हणजे डिसेंबरमध्ये महोत्सव होणार असेल त्यासाठी एप्रिलमध्येच आयोजकांची टीम तयार होते आणि जून-जुलैपासून विद्यार्थी कंपन्यांच्या पायऱ्या झिजविण्यास सुरुवात करतात.

Story img Loader