सागरी नियमन क्षेत्राच्या (सीआरझेड) नियमांकडे डोळेझाक करीत नवी मुंबईतील पाम बीच मार्गासह अन्यत्र खाडीकिनारी उभारल्या गेलेल्या आलिशान गगनचुंबी इमारतींमध्ये सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांची घरे विकत घेऊन मुंबईतील क्वीन्स नेकलेसचा ‘फील’ घेऊ पाहणाऱ्या रहिवाशांना सध्या दोन वेळच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. सीआरझेडच्या कात्रीत सापडलेल्या या इमारतींना कायमस्वरूपी पाण्याची जोडणी देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे यापैकी काही इमारतींना व्यावसायिक दराने पाणी जोडणी देण्याचा पर्याय महापालिकेपुढे आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाटय़ात सापडून नसती आफत ओढवून घ्यायला नको म्हणून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ताकही फुंकून पिऊ लागले आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपयांच्या घरांचे मालक असलेल्या रहिवाशांना दररोज टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर गुजराण करावी लागत आहे.
मुंबईतील मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर उभारण्यात आलेला नवी मुंबईतील पाम बीच मार्ग या शहराचा क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध आहे. एक्स्प्रेस हायवेच्या धर्तीवर बेलापूर ते वाशी या उपनगरांच्या पट्टय़ात उभारण्यात आलेल्या ११ किलोमीटर अंतराच्या या मार्गावर वाहनाची सैर एक अनोखा अनुभव असतो. पूर्वेकडे विस्तीर्ण असा खाडीकिनारा आणि पश्चिमेकडील बाजूस आलिशान, गगनचुंबी इमारतींच्या रांगा. यामुळे पाम बीच मार्गाची ऐट काही औरच असते. या मार्गाला लागून असलेल्या गगनचुंबी इमारतींमध्ये वास्तव्य असणे, हे एक प्रकारे ‘स्टेटस सिम्बॉल’ मानले जाते. यामुळेच मुंबईतील बडे डॉक्टर, चित्रपट अभिनेते, बिल्डर, राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी, आयपीएस दर्जाच्या बडय़ा अधिकाऱ्यांनी या मार्गावर वनश्री, शगुफा, ययाती, अमर, व्हीनस अशा मोठय़ा गृहप्रकल्पांमधून आपली घरे थाटली आहेत. नवी मुंबईतील एका मोठय़ा विकासकाने या मार्गावर उभारलेल्या एका मोठय़ा गृहसंकुलात २९ व्या मजल्यावर थाटलेले सुमारे ६००० चौरस फुटाचे आलिशान घर हे पाम बीच मार्गाच्या ‘श्रीमंती’चे प्रतीक मानले जाते. या मार्गावर श्रीमंतीचा हा जो थाट आहे, तशाच प्रकारे गैरव्यवहार आणि घोटाळ्यांची माळही या ‘क्वीन्स नेकलेस’ची उभारणी करताना गुंफली गेली आहे. मोठय़ा गृहसंकुलांमध्ये सर्रासपणे झालेली एफएसआय चोरी, भूखंड वाटप करताना झालेले गैरव्यवहार, बोगस गृहनिर्माण संस्था उभारून लाटले गेलेले भूखंड आणि या घोटाळ्यांना लाभलेला महापालिका-सिडकोचा आशीर्वादाच्या सुरस कहाण्या या मार्गाला तशा नव्या नाहीत. सागरी नियमन क्षेत्राच्या (सीआरझेड) नियमांकडे डोळेझाक करीत या मार्गावर सर्रासपणे वाटले गेलेले भूखंडाचे प्रकरण पुन्हा एकदा वादात सापडले असतानाच या भूखंडांवर उभ्या राहिलेल्या आलिशान इमारतींवर ‘अनधिकृत’ असा शिक्का बसल्याने कोटय़वधी खर्च करून घर खरेदी करणारे रहिवासी पुरते हादरून गेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा