नांदुर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी कागदोपत्री कोटय़वधी रुपये खर्च झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी डावा तट कालव्याच्या दुरुस्तीवर अवघ्या दोन वर्षांत तब्बल १७ कोटी १२ लाखपेक्षा अधिक तर गोदावरी तट उजव्या कालव्यावर मागील सात वर्षांत सुमारे नऊ कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची बाब माहितीच्या अधिकारान्वये मिळालेल्या उत्तरातून पुढे आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या एकाच विषयाची वेगवेगळ्या कालावधीत माहिती देताना त्यात बरीच तफावत असल्याचे लक्षात येते.
गोदावरी खोऱ्यात दारणा, मुकणे, वालदेवी व भावली या धरण समूहावर नांदुर-मध्यमेश्वर बंधाऱ्यापासून हे दोन कालवे काढण्यात आले. सुमारे ९७ वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या या कालव्यांच्या दीर्घ आयुष्याचा उपयोग यंत्रणा खुबीने डागडुजीच्या कामांसाठी करत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी नांदुर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातील गाळ केवळ कागदोपत्री काढण्याचे प्रकरण उघड झाले होते. बंधाऱ्यातून कोणताही गाळ न काढता कोटय़वधी रुपयांची देयके मंजूर करण्यात आल्याची तक्रार स्थानिक आमदारांनी केली आहे. त्याची चौकशी सुरू असताना काहीसा त्याच्याशी साधम्र्य साधणारा प्रकार या बंधाऱ्यातील दोन कालव्यांविषयी घडल्याचा आक्षेप माहिती अधिकार कार्यकर्ता संजय काळे यांनी निदर्शनास आणला आहे. या कालव्यांच्या दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची माहिती त्यांनी दोन वेळा नाशिक पाटबंधारे विभागाकडून प्राप्त केली आहे. या माहितीनुसार गोदावरी डावा तट कालव्याच्या दुरुस्तीसाठी या विभागाने २००९-१० आणि २०१०-११ या दोन वर्षांत १३ कोटी ५८ लाख ७७ हजार रुपये खर्च केले. याच दोन वर्षांत यांत्रिकी विभागाने तीन कोटी ५३ लाख ८८ हजार खर्च केले. म्हणजे दोन वर्षांत डाव्या कालव्यावर १७ कोटी १२ लाख ६६ हजारहून अधिकची रक्कम खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर याच विषयाशी संबंधित पुन्हा अर्ज सादर केल्यानंतर या विभागाने मागील १२ वर्षांत कालवा दुरुस्तीसाठी १० कोटी ४४ लाख सात हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच यांत्रिकी विभागाने २००८ ते २०१२ या कालावधीत दीड कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे.
एकाच कालव्याची दोन वेळा माहिती देताना खर्चात बरीच तफावत असणारी ही बाब संशयास्पद असल्याचे काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. गोदावरी तट उजवा कालव्याच्या दुरुस्तीवर या विभागाने पाच कोटी ४१ लाख ९० हजारहून अधिक तर यांत्रिकी विभागाने तीन कोटी ६० लाख २४ हजारहून अधिक निधी खर्च केला. या कालव्यावर एकूण नऊ कोटी दोन लाख १५ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या विषयाची माहिती काळे यांनी एकदा जानेवारी २०१२ आणि नंतर एप्रिल २०१३ मध्ये मागितली होती. त्यात लक्षणीय तफावत असून कालवा दुरुस्तीच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. १९९३ ते २००१ या कालावधीत एकही रूपया खर्च झाला नसल्याचे एकदा हा विभाग म्हणतो. कालवा दुरुस्तीवर जो काही खर्च झाला तो सर्व २००१ नंतरचा असल्याचे एका उत्तरात या विभागाने म्हटले आहे. गोदावरी डावा तट कालवा आणि गोदावरी तट उजव्या कालव्याच्या दुरुस्तीवर झालेल्या खर्चाबाबत दिलेल्या माहितीचा आढावा घेतल्यास दोन वर्षांत जो खर्च सांगितला गेला, तो १२ वर्षांच्या खर्चाचा तपशील देताना कमी करण्यात आल्याचे दिसून येते. एकूणच या प्रकाराने पाटबंधारे विभागाचा कारभार कोणत्या धाटणीने चालतो, यावर प्रकाश पडल्याचे काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात या विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधिताने नेमकी कशाची माहिती मागितली, ती कालव्याची दुरुस्ती, देखभाल की व्यवस्थापनाची होती हे आधी तपासावे लागणार असल्याचे सांगितले.