एलबीटी विरोधातील व्यापाऱ्यांचे आंदोलन बारगळले?
‘एलबीटी’ विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सलग चार दिवसांपासून शुकशुकाट पसरलेल्या शहरातील मुख्य बाजारपेठेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बहुतांश दुकाने उघडल्यामुळे ग्राहकांनी खरेदीची संधी साधली अणि व्यापाऱ्यांचे आंदोलन बारगळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा हा मुहूर्त साधत ग्राहकांनी सोन्यापासून ते वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घर, भूखंड अशा खरेदीकडे अधिकओढ दर्शविली. सोन्याच्या दरात चढ-उताराची श्रृंखला सुरू असली तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोने-चांदी खरेदीला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याने अवघा सराफ बाजार झळाळून गेल्याचे पाहावयास मिळाले.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांकडून प्रामुख्याने चोख स्वरूपात दागिने खरेदीला प्राधान्य दिले जाते. या दिवशी दागिन्यांच्या दरात तशी तेजीच असते, असा आजवरचा अनुभव. काही दिवसांपूर्वीच सोन्याचे भाव बरेच कमी म्हणजे प्रति तोळे २५ हजारांपर्यंत खाली आले होते. त्या वेळी बहुतांश ग्राहकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले होते. यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. सोमवारी सकाळी नाशिकच्या सराफ बाजारात ग्राहकांची तुरळक दिसणारी गर्दी हळूहळू वाढू लागली.
दुपारनंतर अनेक दुकाने ग्राहकांनी फुलल्याचे पाहावयास मिळाले. या दिवशी सुट्टी नसल्याने ग्राहक दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत सोने खरेदीला प्राधान्य देत असल्याचे ‘सुवर्ण नक्षत्र’चे संचालक विश्वास आडगावकर यांनी सांगितले. सोमवारी सोन्याचा भाव २७ हजार ५०० रुपये प्रति तोळा होता. काही दिवसांपूर्वी हाच दर २५ हजारांपर्यंत खाली आला होता. हळूहळू दर वाढत असून ते स्थिरावत असल्याचे निरीक्षणही आडगावकर यांनी नोंदविले.
जळगाव व नाशिक येथील आर. सी. बाफना, राजमल लखीचंद, महावीर ज्वेलर्स, आडगावकर व टकले सराफ, जाखडी ज्वेलर्स, नाशिकरोडस्थित दंडे ज्वेलर्स अशा बडय़ा पेढय़ांमध्ये ‘हॉलमार्क’ असणारे चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिल्याचे पाहावयास मिळाले. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी व बिस्किटांचा समावेश होता. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर व्यावसायिकांकडून मांडल्या जाणाऱ्या ‘लकी ड्रॉ’ सारख्या योजना मात्र भाव कमी झाल्याने फारशा दिसल्या नाहीत.
सोन्याबरोबर वाहन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व तत्सम खरेदीलाही ग्राहकांनी प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर, घरकुल व भूखंड नोंदणीही मोठय़ा प्रमाणात झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. व्यापारी वर्गाच्या संपामुळे बाजारपेठ चार दिवस ठप्प झाली होती. यामुळे व्यापारीही ते नुकसान भरून काढण्याच्या तयारीत होते.
अक्षय्य तृतीया हा आंब्याचा स्वाद चाखण्याचा हंगामातील पहिला दिवस मानला जातो.  यामुळे उत्तर महाराष्ट्रातील फळांच्या बाजारात आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळाले. हापूस, लालबाग, पायरी, केशर, लंगडा, दशहरी, तोतापुरी असे विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. यंदा मुबलक उत्पादन असल्याने आंब्याचे दर कमी-कमी होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

व्यापाऱ्यांकडून कृती समितीला ठेंगा
अक्षय्य तृतीयेच्या सणावर व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या ‘एलबीटी’ विरोधातील आंदोलनाचेही सावट होते. व्यापारी कृती समितीने सणोत्सवाच्या दिवशी नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे म्हटले असले तरी बहुतेक व्यापाऱ्यांनी या दिवशी दुकाने बंद ठेवण्यास विरोध केला होता. यामुळे कृती समितीचा नाइलाज झाला आणि व्यापाऱ्यांनी समितीला ठेंगा दाखविल्याचे पाहावयास मिळाले. जवळपास सर्वच दुकाने उघडल्यामुळे वेठीस धरल्या गेलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. मागील चार दिवसांत कोटय़वधींचे आर्थिक नुकसान झाले होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठी उलाढाल होत असल्याने हे नुकसान सहन करण्यास व्यापारी तयार नव्हते. त्यांची ही भूमिका ग्राहकांच्या पथ्यावर पडली. सराफ व्यावसायिक संघटना, इलेक्ट्रॉनिक उपकरण व वाहन विक्रेते, कापड व्यापारी असे घटक या दिवशी बंदमधून बाहेर पडले. कृती समितीचे पदाधिकारी सोमवारी मुंबई येथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सहभागी झाले होते. या संदर्भात धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्याशी दुपारी संपर्क साधला असता त्यांनी व्यापाऱ्यांमध्ये कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा केला. व्यापाऱ्यांची एलबीटीला विरोधाची भूमिका कायम आहे. मुख्य सचिवांबरोबर झालेल्या बैठकीतही ‘एलबीटी’ला पर्याय सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत काही सकारात्मक तोडगा न निघाल्यास मंगळवारपासून बंद पुन्हा सुरू होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Story img Loader