गेवराई आणि बीड येथील सरकारी केंद्रात उडीद खरेदी करताना लाखो रुपयांचा घोटाळा माहितीच्या अधिकारात उघडकीस आला आहे. ज्या १२२० शेतकऱ्यांकडून उडीद खरेदी करण्यात आला, त्यातील १४२ जणांच्या नावावर शेतीच नसल्याचे आढळून आले आहे. तर तलाठय़ाशी संगनमत करून २१८ हेक्टर क्षेत्रात अधिकचा उडदाचा पेरा दाखविण्यात आला आणि हमीभावापेक्षा कमी रकमेने खरेदी केलेले उडीद शासनाला मात्र हमीभावाने विकले. या प्रकरणात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असल्याचा दावा अ‍ॅड. अजित देशमुख यांनी केला.
हमीभावाने उडीद खरेदी करण्याच्या योजनेंतर्गत अधिकारी, व्यापारी यांनी संगनमत करून सातबारावर बनावट पेरा नोंदवला. या घोटाळ्यात मार्केटिंग फेडरेशन, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, तलाठी व बँकेच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. गेल्या वर्षी हमीभावानुसार उडीद खरेदी करण्यासाठी गेवराई आणि बीड येथे दोन केंद्र सुरू करण्यात आले होते. प्रतिक्विंटल ४ हजार ४०० रुपये उडदाचा भाव होता. प्रत्यक्ष खरेदी करताना शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पेऱ्याअनुसार उडदाची खरेदी करून पैसे धनादेशाद्वारे देणे या योजनेत बंधनकारक होते. अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी संगनमत करून शेतकऱ्यांकडील उडीद कमी भावाने खरेदी केले. शासनाला मात्र, ते अधिक दराने दिले गेले. या अनुषंगाने अ‍ॅड. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान घोटाळा उघडकीस आला.
तलाठय़ाशी संगनमत करून सातबाऱ्याच्या उताऱ्यावर २१८ हेक्टर क्षेत्रात पेरा दाखवून २२०० क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला. यात ९८ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला. ३०२ शेतकऱ्यांनी उडदाचा पेरा केलेला नसतानाही त्यांच्या नावावर ६६२ हेक्टराची नोंद घेण्यात आली. त्यांच्याकडून ५ हजार ५१९ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आले. हमीभावात तफावत ठेवून यात अडीच कोटी रुपयांचा घोटाळा झाला. एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या नावे अनेक वेळा उडदाची खरेदी दाखविण्यात आली. ३३१ कुटुंबांतील ६४९ व्यक्तींच्या नावावर १२ हजार क्िंवटल उडीद खरेदी झाले. यात साडेचार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. गेवराई, शिरूर, माजलगाव आणि वडवणी तालुक्यात उडीद पिकाचा पेरा झाला नसल्याचा कृषी अधीक्षकांचा अहवाल आहे. प्रत्यक्षात या तीन तालुक्यांतून ३३९ शेतकऱ्यांनी ५ हजार ४२० क्विंटल उडदाची विक्री केल्याचे माहितीच्या अधिकारातील कागदपत्रात दिसून येते. खरेदी केलेल्या उडदाचे पैसे धनादेशाने देणे आवश्यक होते. मात्र, असे न करता खरेदी-विक्री संघ व फेडरेशनच्या कर्मचाऱ्यांनी रक्कम वाटप केली. एकाच व्यक्तीजवळ अनेक धनादेश देऊन ते वटविण्यात आले. या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अ‍ॅड. देशमुख यांनी केला. या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Story img Loader