तालुक्यातील कोहकडी येथे १० एकर वनजमिनीवर पारधी, भिल्ल आदी समाजाच्या लोकांनी केलेले अतिक्रमण बुधवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्या व ते काढण्यास विरोध करणाऱ्या ३१ स्त्री-पुरुषांना पोलिसांनी अटक केली. त्यांना दि. ३१पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, अतिक्रमण काढण्यास या लोकांनी प्रखर विरोध केल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्यात आला.
कोहकडी शिवारातील वनहद्दीच्या खुणा नष्ट करून, झाडेझुडपे नष्ट करून या कुटुंबांनी ३० तात्पुरत्या झोपडय़ा बांधल्या होत्या. शिवाय सुमारे आठ एकर क्षेत्रावर नांगरट तसेच कुळवणी करून ज्वारीची पेरणीही करण्यात आली होती. जिल्हा उपवनसंरक्षक जी. टी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वन अधिकारी बी. आर. कदम, एस. एस. दौंड यांनी दहा वन परिक्षेत्र अधिकारी, ३५० वनपाल, वनरक्षक तसेच वनमजुरांच्या मदतीने सकाळी दहाच्या दरम्यान ही कारवाई केली. पोलीस उपाधीक्षक डॉ. अनिता जामदार, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, किसन पडवळ, सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्यासह १५ महिला पोलीस कॉन्स्टेबल, ३५ पोलीस कॉन्स्टेबल यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कारवाई करून मुद्देमालासह या आरोपींना पारनेरला आणल्यानंतर तालुक्यातील या समाजाच्या अन्य लोकांना त्याची कुणकुण लागली. अतिक्रमण करणाऱ्या लोकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सुमारे पाचशे स्त्री-पुरुषांनी वन विभाग तसेच तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. या आरोपींना न्यायालयात नेतानाही या लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना प्रतिबंध करून दोन्ही बाजूंचे रस्ते बंद केले. पोलीस तसेच वन कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामुळे तहसील कार्यालय तसेच न्यायालय परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर त्यांच्या काही समर्थकांनी येथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्या वेळी त्यांची पोलिसांशीही बाचाबाची झाली. अटक करण्यात आलेले आरोपी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांची नावेही सांगण्यास तयार नव्हते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा