तबला तयार करण्यापासून ते वाजवण्यापर्यंत त्यावर शतकानुशतके पुरुषांचीच मक्तेदारी आहे. मात्र गेली २७ वर्षे काही महिला या समजुतीला छेद देत तबला बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत.
लालबागच्या गणेश टॉकीज परिसरातील श्रॉफ बिल्डिंगचे गणेशोत्सवांतील नाटय़ आणि संगीत क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. येथेच २७ वर्षांपूर्वी प्रमिला जाधव यांनी तबल्याला शाई लावण्याचे काम सुरू केले. शांताबाई गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रमिला जाधव यांनी सुरू केलेल्या या कामामुळे आज याच परिसरातील सहा-सात महिलांना रोजगार आणि पर्यायाने स्वत:ची ओळख मिळाली आहे.
या भागात तबला, ढोलकी, मृदंग तयार करणाऱ्यांची काही दुकाने आहेत. त्यापैकीच एक शांताबाईंचे आहे. या दुकानात सहज म्हणून डोकावले, तरी सहा महिला खाली मान घालून तबला किंवा मृदंगाच्या पृष्टभागावर शाई घासत बसलेल्या दिसतात. प्रमिला जाधव यांची मुलगी दीपाली झिरगे, बहीण रेखा पवार यांच्यासह प्रिया उतेकर, संजीवनी काजरोळकर अशा सहा महिला येथे काम करतात. दिवसभर तबल्यावर शाई घासून एका दिवसात साधारणपणे दोन नग त्या तयार करतात.
तबल्यासाठी लागणारी शाई ही भारगाव येथून येते. ही शाई म्हणजे लोखंडाची पावडर असते. त्यामध्ये रव्याची खळ मिसळून शाई तयार केली जाते. तबल्याची वादी, पुडी कितीही चांगली लागलेली असली, तरी तबल्याला शाई लागल्याशिवाय त्यातून मधुरध्वनी उमटत नाही. त्यामुळे आमचे काम महत्त्वाचे आहे. चांगली शाई लावण्यासाठी एका तबल्याला चार-चार तास घासावे लागते. तर एका नगाचे केवळ ७० रुपये मिळतात, असे प्रमिला जाधव यांनी सांगितले.
गेली २७ वर्षे हाच व्यवसाय करताना खूप मजा आली. आम्ही मूळ कोकणातल्या. कोकणात दशावतारी, भजनी मंडळे यांचे खूप प्रस्थ आहे. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण शाई लावलेला तबला किंवा मृदंग वाजताना पाहून खूप आनंद होतो, अशी कृतकृत्यता त्या व्यक्त करतात.