कसलं बंधन नाही. कुणाला बांधील नाही. कुणाला जाब द्यायचा नाही, की कसला पाश नाही. नात्यांचा कुठला काच नाही. कसल्या जबाबदाऱ्या नाहीत, की कुणात गुंतणं नाही. काही कमवायचं नाही. त्यामुळे काही गमावणंही नाही. बस्स. केवळ निरुद्देश, निर्हेतुक, समोर येईल तसं आयुष्य जगायचं.. मुक्त. मोकळं. स्वान्त सुखाय. मनाला येईल तसं. मन मानेल तसं. समोर येईल त्या दिशेनं जात राहायचं. येईल तो अनुभव सर्वस्वानं घेत राहायचा. त्यातला आनंद लुटत राहायचं..
आयुष्याबद्दलचा असा स्वप्नवत चकवा प्रत्येकाच्याच मनात कधी ना कधी येऊन जात असतो.. गेलेला असतो. असं मुक्त-मोकळं आयुष्य जगायला कुणाला नाही आवडणार? मंगेश पाडगांवकरांनीही आपल्या एका कवितेत अशा निर्भर, मनसोक्त भरारीचे गोडवे गायिले आहेत. पण.. पण त्यानंतर पुढं काय? आपलं घरटं सोडून असं किती काळ आभाळात मुक्तपणे विहरणार? कधीतरी त्याचासुद्धा कंटाळा हा येणारच! पुढं काय? पुढं..? पुनश्च आपल्या घरटय़ाकडे परतण्याशिवाय दुसरं काय उरणार? म्हणजे पुन्हा ते काच आलेच. ती नातीगोतीही आली. त्यांच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या आल्या. त्या पूर्ण करणं आलं. त्यांतले ताणतणाव आले. म्हणजे गुंतणंही आपसूक आलंच. या साऱ्यात मग आपलं.. आपल्याला हवं असलेलं स्वातंत्र्य उरतंच कुठं?
रवींद्रनाथ टागोरांनीही अशा एका आदर्श.. काहीशा स्वप्नवत जगण्याची कामना एका कवितेत केलेली आहे. पण ती पुरी होणं महामुश्कील. नव्हे, अशक्यच!
मिलिंद बोकील यांच्या ‘अधिष्ठान’ या कथेतला नायक विश्वनाथ हाही अशाच मनमुक्त स्वातंत्र्याच्या शोधात आपली बायको आणि मुलाला सोडून शिक्षणाचं निमित्त पुढं करून अमेरिकेला जातो आणि मग भारतात परततच नाही. संसार, नातीगोती, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती या चाकोरीबद्ध जगण्याचा त्याला विलक्षण कंटाळा आलेला असतो. यातून त्याला सुटका करून घ्यायची असते. या झमेल्यात अडकल्यामुळेच आपल्या हातून आपल्या मनासारखं भरीव असं काही घडू शकत नाही.. शकलेलं नाही- असं त्याच्या मनानं घेतलेलं. त्यामुळे संधी मिळताच तो अमेरिकेला निघून जातो. स्वातंत्र्याच्या शोधात..! सुरुवातीला काही काळ बायकोशी फोन, पत्रं, ई-मेलवरून संपर्कात राहणारा विश्वनाथ हळूहळू तिच्यापासून अलग होत जातो. नंतर तर तिच्यापासून स्वत:ला सोडवून घ्यायचंच ठरवतो. गायत्रीला आपण घटस्फोट घेऊयात म्हणून कळवतो. म्हणजे मग तीही मोकळी अन् आपणही.. आपापल्या मार्गानं जायला!
अमेरिकेतील हिप्पींचं आयुष्य अभ्यासताना त्यांच्या ‘स्वातंत्र्य’कल्पनेचा तो सखोल वेध घेऊ इच्छितो. त्यासाठी संपूर्ण अमेरिका तो त्यांच्यासमवेत भटकंती करतो. त्यांची अस्थिर, भटकी जीवनशैली, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची वृत्ती.. सगळं सगळं जवळून समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यातून साकारतो- हिप्पींच्या जीवनशैलीवरील त्याचा संशोधनपर ग्रंथ!
‘स्वातंत्र्य’कल्पनेचा इतक्या निकटचा अनुभव घेतल्यावर त्याला स्वातंत्र्य म्हणजे काय, हे खूप आतून जाणवतं. सर्वापासून सुटका करून घेणं म्हणजेच स्वातंत्र्य- हा अर्थ तितकासा बरोबर नाही, हेही कळून चुकतं. तो भारतात परततो. पण सहा महिने गायत्रीला भेटत नाही. त्यानंतर त्याला जाणवतं, की यालाही काही अर्थ नाही. तो तिला भेटतो तेव्हा साहजिकच त्याच्या मनात  अपराधभाव असतो. तीही त्याला त्याच्या करणीबद्दल खरं-खोटं सुनावते. त्यानं असं अचानक तिला (तिचा काहीएक गुन्हा नसताना!) सोडण्यानं तिला झालेल्या मानसिक, भावनिक तसंच शारीर यातनांची आग त्याच्या निव्वळ ‘सॉरी’ म्हणण्यानं विझणार नसते. याची जाणीव ती त्याला तीव्र शब्दांत करून देते. त्याच्या पश्चातचं तिचं आयुष्य ती त्याच्यासमोर खुलेपणानं मांडते. अगदी- नंदन नावाच्या प्रोजेक्टवरील सहकाऱ्याशी जुळलेल्या भावबंधांपासून ते डॉ. राव या विदुषीनं तिच्या आयुष्याला दिलेल्या प्रयोजनापर्यंत.. सगळं काही! तोही ते सारं समंजसपणे स्वीकारतो. त्याची झाल्या गोष्टींबद्दल काहीही तक्रार नसते.
परंतु याच्या पुढं काय..?
ती त्याला स्वीकारू इच्छिते?
याचं उत्तर ती न बोलताच देते. डॉ. राव यांच्यासमवेत तिनं एका प्रोजेक्टवर काम करायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी तिला दोन वर्षे बाहेर जावं लागणार असतं. तिच्या पश्चात तो राहुलची (मुलाची) जबाबदारी घ्यायला तयार आहे का, असं ती विचारते. राहुलचा बाप म्हणून तिनं त्याला स्वीकारलेलं असतं. पण नवरा म्हणून..? तो निर्णय ती यथावकाश घेणार असते.
मिलिंद बोकील यांची ‘अधिष्ठान’ ही कथा ‘स्वातंत्र्य’कल्पनेचा, त्यातल्या फसव्या चकव्यांचा आणि खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा वेध घेणारी आहे. साधी-सरळ, परंतु गाभ्याला भिडणारी. प्राप्त वास्तव समंजसपणे स्वीकारणं, आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन सापडणं- हेच तर खरं स्वातंत्र्य होय. घर-संसार, जबाबदाऱ्यांपासून पळून जाऊन खुशालचेंडू, आपमतलबी किंवा निरुद्देश जगणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. ती एक फसवी अवस्था असते. तिचाही कधीतरी वीट येणारच.. आणि येतोही. दीपक राजाध्यक्ष यांनी या कथेचं केलेलं नाटय़रूपांतर संथ, ठाय लयीतलं आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांचं पोस्टमॉर्टेम या कथेत होतं. त्या घटनांनी भूत-वर्तमानातले आमूलाग्र बदललेले संदर्भ, बदललेली नाती, कोमेजलेल्या भावना, चुकविलेली किंमत.. या सगळ्याचा ताळेबंद यात मांडलाय. त्यामुळे प्रेक्षकाला अपेक्षित तेच नाटकात घडत जातं. त्यात ‘नाटय़पूर्ण’ संघर्ष काहीच नाहीए. तरीही नाटक आपल्याला धरून ठेवतं ते त्यातल्या मानवी संबंधांकडे सहृदयतेनं पाहण्याच्या लेखकीय दृष्टिकोनामुळे! मानसिक-वैचारिक ताणतणाव हाच या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. दिग्दर्शक आशुतोष दातार यांनीही याचं पुरेपूर भान राखलं आहे. म्हणूनच त्यांनी पात्रांच्या हालचाली सीमित ठेवून त्यांच्या ‘संवादा’वर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. या संवादात विरामाच्या जागाही तितक्याच, किंबहुना अधिक महत्त्वाच्या आहेत. या कथेतला विश्वनाथ फारच कमी बोलतो. जवळजवळ नाहीच. त्याचं व्यक्त होणं त्याच्या देहबोलीतूनच जाणवतं. शब्दांनी बोलते ती गायत्री. तिचं वैफल्य, तिचं सोसणं, तिचा समंजसपणा, तिचं स्वत:ला सापडणं.. हे सगळं सगळं ती शब्दांतून व्यक्त करते. अर्थात या म्हटलं तर एकतर्फी संवादातल्या गायत्रीच्या ‘बिट्वीन द लाइन्स’ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हा दोन समंजस व्यक्तींमधला.. खरं तर ज्यांना आपल्या जगण्याचं श्रेयस अन् प्रेयस सापडल्यानं शांत, निवांत झालेल्या व्यक्तींमधला हा संवाद आहे. त्यामुळे तो आक्रस्ताळी पातळीवर जात नाही. जाण्याची शक्यता निर्माण होते तेव्हाही जात नाही. हे अत्यंत संयतपणे केलेल्या प्रयोगाच्या हाताळणीतून सतत जाणवत राहतं. मंगेश भिडे यांनी पाश्चात्य सुरावट आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा पाश्र्वसंगीतात वापर करून नाटकाची अंगभूत लय जपली आहे. रवी-रसिक यांचं सूचक नेपथ्य आणि मूड्सनुसारी प्रकाशयोजना आशयाला उठाव देते. लीना दातार यांनी वेशभूषेतून पात्रांच्या भावावस्थेशी तादात्म्य साधलं आहे.
नवऱ्याच्या अकस्मात सोडून जाण्यानं मानसिक व भावनिक कोंडमारा झालेली, दयाद्र्र व वखवखलेल्या समाजनजरांनी केविलवाणी झालेली, एकाकीपणाच्या जाणिवेनं सैरभैर झालेली आणि काही काळानं त्या धक्क्य़ातून स्वत:ला थोडंसं सावरल्यावर आपल्या भविष्याचा खोलात जाऊन विचार करणारी, त्यानंतर नंदनबरोबरचे क्षण कोणत्याही अपराधगंडाविना डोळसपणे उपभोगणारी तसंच डॉ. राव यांची भेट झाल्यावर या संबंधांतलं वैय्यर्थ समजून आल्यानं नंदनशी फारकत घेऊन संशोधनाच्या कामातला आनंदात रममाण होत आयुष्याचं प्रयोजन सापडलेली गायत्री.. अशा तिच्या नानाविध भावावस्था गीता पांचाळ यांनी उत्कटतेनं साकारल्या आहेत. वैफल्य, राग, प्रेम, साफल्य, स्थितप्रज्ञता या सगळ्याच भावना त्यांनी ताकदीनं अभिव्यक्त केल्या आहेत.
विश्वनाथचं अपराधगंड वागवीत गायत्रीला समजून घेणं, आपल्या भूतकाळातील वर्तनाचा तिच्याकडून (रागाच्या भरात) विपर्यस्त अर्थ लावला जात असतानाही कमालीचा संयम राखणं, आपल्या भावनांवर ताबा ठेवत तिच्या आयुष्यातल्या घडामोडी सहजगत्या स्वीकारणं, नव्या परिस्थितीत नवरा म्हणून तिनं आपल्याला ताबडतोब स्वीकारायला नकार देण्यामागची तिची बाजू समंजसपणे समजून घेणं, वगैरे विश्वनाथच्या रूपातील विक्रांत कोळपे यांनी शब्दांविना.. किंवा कमीत कमी शब्दांत अत्यंत संयतपणे व्यक्त केल्या आहेत. मात्र, त्यांचं विझलेपण आणि अपराधगंड काहीसा अती वाटतो. कदाचित गायत्री आणि राहुलवर केलेल्या अन्यायाची टोचणी विश्वनाथला जास्त खात असावी.  

Story img Loader